बारामती : राज्यात सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सुरू केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार 1991 पासून सातत्याने विजयी होत आले आहेत. या मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे.
मध्यंतरी झालेल्या धनगर आंदोलन आणि लोकसभेच्या वेळेस महादेव जानकरांनी केलेली हवा या पार्श्वभूमीवर विरोधकांना सध्या आशा वाटत आहे. सगळे विरोधक एकत्र आले तर बारामतीतही चमत्कार घडू शकेल, असा दावा विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती टेक्स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी अनेक गावांना भेट देत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बारामती शहरातही त्यांनी बूथ समितीचे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याशी स्वतः चर्चा केली. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
अजित पवार हे शक्तिशाली उमेदवार असल्याने एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करतील, अशी शक्यता आहे. काहीही झाले तरी अर्ज भरून राज्यात प्रचारासाठी जायचे आणि सांगता सभा बारामतीत घ्यायची, असाच अजित पवार यांचा यंदाच्या निवडणुकीचाही कार्यक्रम असल्याचे समजते.
मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न
टोलमाफी व पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे आलेले पाणी हे दोन मुद्दे राष्ट्रवादीने विरोधकांच्या हातातून घेतल्याने आता विरोधक कोणत्या मुद्द्यावर विरोध करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभेने 90 हजारांचे मताधिक्य दिले. विधानसभेला त्यापेक्षा अधिक मताधिक्य देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.