मुंबई : ‘एबीपी माझा आणि नेल्सन’च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील स्थिती असल्याचे दिसत आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे-अन्य पाचव्या क्रमांकावर असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मतदान पूर्ण झाल्यानंतर भाजप थेट १४४ जागा मिळवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. १४४ जागा मिळवल्या तर भाजपला सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी केवळ एकाच जागेची गरज भासणार आहे. त्यामुळं भाजप संपूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज एबीपी-नेल्सनच्या पोलतून वर्तवण्यात आला आहे. याआधी १२७ जागा मिळतील असे सांगण्यात आले होते.
भाजप क्रमांक एकचा पक्ष
या सर्वेत भाजपच्या वाटेला १२७ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ८१ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीविरोधी लाटेचा फायदा भाजपला झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मोदी फॅक्टर अजूनही कायम असल्याचे या एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले आहे.
शिवसेनेला जरासाच फायदा
शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल, त्यांना ७७ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ३३ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचा फायदा तसेच सरकार विरोधी लाटेचा फायदा शिवसेनेला झाला असला तरी भाजपच्या प्रमाणात कमी जागा असल्याने येथे शिवसेनेचा तोटा झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
काँग्रेसला दणका
काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ४० जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ४२ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. सरकार विरोधी लाटेचा फटका सर्वाधिक काँग्रेसला बसल्याचे दिसते आहे.
राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर
राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकाचा पक्ष असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना केवळ ३४ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये केवळ २८ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मागे फेकली गेल्याचे दिसत आहे. काँग्रेस सोबतची आघाडी तोडल्याने मोठे नुकसान सोसावे लागल्याचे या एक्झीटपोलमध्ये दिसत आहे.
राज ठाकरे आणि अपक्षांचा करिष्मा नाही
मनसे आणि अपक्षांचा करिष्मा चालणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना केवल ५ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ आणि इतरांना ४१ जागा मिळाल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.