'गांधी', 'हिना'फेम अभिनेते सईद जाफरी यांचं निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सईद जाफरी यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन झालंय. 

Updated: Nov 16, 2015, 06:05 PM IST
'गांधी', 'हिना'फेम अभिनेते सईद जाफरी यांचं निधन title=

नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सईद जाफरी यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन झालंय. 

सईद यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांची पुतमी शाहीन अग्रवाल हीनं फेसबुकच्या माध्यमातून दुजोरा दिलाय. परंतु, जाफरी यांचा मृत्यूचं नेमकं कारण मात्र अजून समजलेलं नाही. 'जाफरिंच्या एका पीढीचा आज अंत झालाय. सईद जाफरी यांनीही या जगाचा निरोप घेऊन ते आपल्या भावा-बहिणींजवळ पोहचलेत' असं शाहीननं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. 


शाहीन अग्रवाल हिची फेसबुक पोस्ट

सईद जाफरी यांची कारकीर्द... 

आपल्या काळातील अत्यंत प्रतिभावान कलाकारांपैंकी एक असलेल्या जाफरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात आकाशवाणीतून केली होती. त्यानंतर ते फुलब्राईट स्कॉलर म्हणून अमेरिकेला गेले. इथं त्यांनी 'द कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका'मधून नाटकावर अभ्यास केला. 

शेक्सपिअरच्या नाटकांना घेऊन अमेरिकेच्या यात्रेवर जाणारे जाफरी हे पहिले भारतीय होते. याच दरम्यान त्यांनी मधुर जाफरी यांच्यासोबत विवाह केला. त्यांनी जवळपास १०० हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय.  

सईद जाफरी यांना हिना, शतरंज के खिलाडी, दिल, किशन कन्हैय्या, घर हो तो ऐसा, राजा की आएगी बारात, मोहब्बत, आंटी नंबर वन यांसारख्या सिनेमांतील दमदार अभिनयामुळे ओळखलं जातं. 

यांशिवाय, चश्मे बद्दूर, मासूम, किसी से ना कहना, मंडी, मशाल, राम तेरी गंगा मैली, राम लखन, अजूबा यांसारख्या सिनेमांतही ते दिसले. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर... 

ते द मॅन हू वूड बी किंग, डेथ ऑन द नील, स्फिनिक्स, द ज्वेल इन द क्राऊन, ए पॅसेज टू इंडिया, माय ब्युटीफुल लांद्रेट, द डिसीवर्स, आफ्टर मिडनाईट, ऑन विग्स ऑफ फायर आणि चिकन टिक्का मसाला यांसारख्या सिनेमांतून त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावरवरही पोहचली. 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा पुरस्कार मिळवणारे जाफरी हे पहिले भारतीय ठरले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.