मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उडता पंजाब या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद संपण्याची शक्यता आहे.
उडता पंजाबला से्न्सॉर बोर्डने आता फक्त चित्रपटातील १३ सीन्स कट करून 'अ' श्रेणी देउन चित्रपट रिलीज करण्यास मंजूरी दिल्याची माहिती सीबीएफसीचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिलीये.उडता पंजाब हा चित्रपट तरूणाईमधील अंमली पदार्थांचे वाढते व्यसन या विषयावर आधारित आहे.
सीबीएफसीच्या ९ सदस्यांनी उडता पंजाब पाहिला आणि १३ सीन्स कट करायला सांगून फिल्मला संमती दिलीये. या आधी चित्रपटातील ८९ सीन्स कट करायला सांगितले होते त्यावर चाहत्यांकडून आलेल्या टिकांमुळे सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांनी फिल्म पाहिली आणि आता केवळ १३ कट्स सांगितल्याचे निहलानी म्हणाले.
सीबीएफसीचे काम आता पूर्ण झाले आहे तरीही आता कोर्टात जायचे की नाही हे निर्मात्यांनी ठरवावे, असेही पुढे निहलानी यांनी सांगितले. अभिषेक चौबे दिग्दर्शित उडता पंजाब १७ जूनला रिलीज होण्याची शक्यता आहे.
यादरम्यान निहलानींना विचारले असता त्यांनी सांगितले की जी लोक मला 'घटिया' म्हणत होती ती लोक स्वत:च घटिया आहेत. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांनी स्वत:ला कधीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा 'चमचा' मानले नाही.
उडता पंजाब चित्रपटाच्या वादावर हायकोर्ट आज निकाल देणार आहे. मात्र कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच उडता पंजाबला ‘अ’ श्रेणी प्रमाणपत्र दिल्यामुळे कोर्ट काय निर्णय देईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे