नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लिओनचा नवी सिनेमा 'मस्तीजादे' सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकलाय... अर्थात त्यामुळे, या सिनेमाचं प्रदर्शनही अडकलंय.
केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डानं (सीबीएफसी) या सिनेमातील काही दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेतलाय. या सिनेमातील दृश्य आणि संवाद हे 'वयस्क' हा टप्पा पार करून अश्लीलतेकडे झुकलेले आहेत आणि ते सावधानीपूर्वक हटवण्याची गरज आहे, असं बोर्डाला वाटतंय.
सनी लिओनचा हा सिनेमा १ मे रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, सिने निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून अजूनपर्यंत प्रमाणपत्र मिळालेलं नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सीबीएफसीनं सिनेमाच्या अनेक भागांना कात्री लावलीय. सिनेमात असलेले बोल्ड आणि अश्लील दृश्यांमुळे हे पाऊल उचलण्यात आलंय. बोर्डाची एक दुसरी समिती सिनेमाला प्रमाणपत्र देण्याविषयी अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे, सिनेमातील इतरही काही दृश्यांना आणि संवादांना कात्री लागण्याची शक्यता आहे. बोर्डाचे अनेक सदस्य सिनेमातील सामग्रीवर नाखूश आहेत. त्यामुळे सिनेमाला प्रमाणपत्र देण्यासाठी अजून वेळ लागू शकतो.
दरम्यान, सिनेमाची निर्माता रंजीता नंदी यांनी मात्र याविषयी काहीही बोलण्यास नकार दिलाय. दिग्दर्शक मिलाप जावेरी यांच्या म्हणण्यानुसार, सिनेनिर्माता याविषयी आपली भूमिका सेन्सॉर बोर्डासमोर मांडू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.