मुंबई : आपण करीनासोबत काम करणार नाही असं कधी म्हटलंच नव्हतं, असं म्हणत शाहीद कपूरनं करीनासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला संधी मिळाली तर ती नाकारणार नसल्याचंच म्हटलंय.
एकेकाळचे सगळ्यात स्वीट लव्हबर्ड्स म्हणून ओळखलं जाणारं जोडपं म्हणजेच, अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर... चार वर्ष चाललेल्या त्यांच्या प्रेम कहाणीचा अखेर २००७ मध्ये अंत झाला. त्यानंतर करीनानं सैफ अली खानची बेगम बनणं पसंत केलं... त्यामुळे, आता हे दोघे पुन्हा कधीच स्क्रिन शेअर करताना दिसणार नाहीत, असंच त्यांच्या फॅन्सला वाटत होतं...
पण, हे आडाखे साफ चुकीचे ठरलेत... आणि तशी संधीही निर्माण झालीय. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या 'उडता पंजाब' या चित्रपटात शाहिद आणि करिना पुन्हा एकदा एकत्र दिसतील, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
नुकतंच, एका मुलाखतीत बोलताना शाहीद कपूर 'मी करिनासोबत काम करण्यास कधीच नकार दिलेला नाही' असं म्हणत कामानिमित्त एकत्र येण्याला आपली काहीही हरकत नसल्याचं स्पष्ट केलंय. आता पुढील सगळ्या गोष्टी सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर अवलंबून असेल, असंदेखील त्यानं म्हटलंय.
यापूर्वी फिदा, ३६ चायना टाऊन, मिलेंगे मिलेंगे, चुप चुपके या सिनेमांमध्ये शाहीद आणि करिना एकत्र दिसले होते. 'जब वी मेट' या दोघांनी एकत्र केलेला शेवटचा चित्रपट होता... हा सिनेमा प्रेक्षकांनी भलताच उचलून धरला होता.
सध्या तरी शाहिद विकास बेहेल यांच्या 'शानदार' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे... त्याच्याकडून करीनासोबत काम करण्यास काहीही हरकत नसली तरी यावर 'बेबो'चं काय म्हणणं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.