3 दिवसांनी ही मुलगी पसंत पडणार का ?

लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका बघायच्या का नाही, यावरुन बरेच वाद होतात. या वादवरच भाष्य करणारी नवी मालिका 'पसंत आहे मुलगी' झी मराठीवर सुरु होत आहे.

Updated: Jan 22, 2016, 08:54 PM IST
3 दिवसांनी ही मुलगी पसंत पडणार का ? title=

मुंबई: लग्न ठरवताना वधू-वरांच्या पत्रिका बघायच्या का नाही, यावरुन बरेच वाद होतात. या वादवरच भाष्य करणारी नवी मालिका 'पसंत आहे मुलगी' झी मराठीवर सुरु होत आहे. येत्या 25 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.00 वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. 

‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेतून उर्मी आणि वासूच्या भूमिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. वासूच्या वडिलांच्या म्हणजेच पंतांच्या  भूमिकेत डॉ. गिरीश ओक बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत मेघना वैद्य, पद्मनाभ बिंड, केतकी सराफ, नम्रता कदम, रमा जोशी, विजय मिश्रा, सिद्धीरूपा करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काय आहे मालिकेची कथा ?

'पसंत आहे मुलगी'ची कथा आहे उर्मी आणि वासूची. कॉलेजमध्ये एकाच वर्गात शिकणारे हे दोघं भिन्न स्वभावाचे आहेत. चांगल्या कामासाठी चांगला मार्ग अवलंबायला हवा, असं मानणारी उर्मी, तर काम चांगलं असेल तर मार्ग चुकीचा असला तरी चालेल, असं मानणारा वासू, या दोघांभोवती या मालिकेचं कथानक फिरतं. उर्मीच्या घरात पुरोगामी विचाराचं वातावरण. तर वासू पंत कुटुंबातला. त्याचे वडिल गावचे मठाधिपती. पंचक्रोशीत या पंतांना मोठा मान. त्यांचा शब्द म्हणजे आदेश आणि तोच अंतिम निर्णय असे मानणारे त्यांचे अनेक अनुयायी. अशा वातावरणात वाढलेला वासू हा खरं तर दुहेरी आयुष्य जगतोय.गावात त्याची असलेली पुनर्वसू पंत अशी ओळख तो शहरात लपवतो. 

आपल्या रोखठोक स्वभावामुळे कॉलेजमध्ये लोकप्रिय असलेली उर्मी वासूला मनापासून आवडत असते परंतु आपल्या मनातील भावना तो कधी व्यक्त करत नाही. कॉलेजमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्याद्वारे त्या दोघांमध्ये मैत्री होते आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं.  याचदरम्यान वासू उर्मीला लग्नाची मागणी घालतो.

उर्मीलाही वासूमध्ये आपला भावी जोडीदार दिसतो त्यामुळे तीही यासाठी तयार होते. परंतू इथूनच वासूची खरी परीक्षा सुरू होते. वासूच्या घरात प्रत्येक गोष्टीसाठी पत्रिका आणि पंचांगाचा आधार घेतला जातो. पण उर्मीच्या आई वडिलांनी तिची पत्रिकाही बनवली नाही. इकडे खरा पेचप्रसंग उभा राहतो.

मग आता वासू काय करणार ? हे लग्न जुळवण्यासाठी तो उर्मीसमोर खरी गोष्ट मांडणार की घरातल्या लोकांसमोर एखाद्या खोट्या गोष्टीचा आधार घेणार ? उर्मी या सर्वासाठी तयार होईल का मने जुळलेली असताना पत्रिका जुळणंही तेवढंच महत्त्वाचं असतं का या सर्वांची उत्तरे म्हणजे ही मालिका.