सिनेमा - मेरी कोम
दिग्दर्शक - उमंग कुमार
लेखक - करण सिंग राठोड, रमेंद्र वशिष्ठ
संगीत - शशी - शिवम
अभिनय - प्रियांका चोप्रा, सुनिल थापा, दर्शन कुमार
वेळ - 122 मिनिट
मुंबई : खऱ्याखुऱ्या जीवनात इतरांसाठी प्रेरणा ठरलेल्या आणि पाच वेळा वर्ल्डकप चॅम्पियन म्हणून आपलं नाव कोरणाऱ्या एका महिला बॉक्सरच्या जीवनावर ‘मेरी कोम’ या सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे, हे एव्हाना आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमानंतर उमंग कुमार निर्मित हा आणखी एक बायोपिक बॉलिवूडमध्ये आलाय. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याशिवाय ‘मेरी कोम’च्या भूमिकेला बॉलिवूडमधली एकही अभिनेत्री न्याय देऊ शकली नसती, असं हा सिनेमा पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
कथानक
मणिपूरच्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या मेरी कोमला (प्रियांका चोप्रा) लहानपणापासूनच बॉक्सिंगची आवड आहे. पण, तिच्या वडिलांना (रॉबिन दास) मात्र तिच्या या खेळ्याच्या आवडीची तिडिक आहे. तरिही, मेरी कोम आपल्यासाठी एक गुरु (सुनील थापा) शोधतेच आणि आपला बॉक्सिंगचा प्रवास सुरु करते. या संघर्षात तिला ऑनलरची (दर्शन कुमार) सोबत मिळते. वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळवल्यानंतर मेरी आणि ऑनलर विवाहबंधनात अडकतात. यामुळे, मेरीचे गुरु तिच्यावर चिडतात आणि तिच्याशी बोलणंही बंद करतात.
बॉक्सिंग सोडून दिलेली मेरी जुळ्या मुलांची आई बनते. पण, लवकरच आपली हरवलेली ओळख आणि आयुष्यातल्या बॉक्सिंगची कमतरता तिला जाणवत राहते. पण, एव्हाना सगळी परिस्थिती तिच्याविरुद्ध आहे. या परिस्थितीवर विजय प्राप्त करत मेरी पुन्हा एकदा चॅम्पियनचा खिताब आपल्या नावावर करते.
अभिनय – प्रियांका चोप्रा
अभिनयाचं म्हणाल तर प्रियांका चोप्रा ही सुरुवातीपासूनच बॉक्सर प्रियांका चोप्रा म्हणून जास्त जाणवत राहते. प्रियांकानं बहुतेक सीन्समध्ये मणिपूरच्या लोकांप्रमाणे हिंदी बोलण्याचा प्रयत्न केलाय. पण, सिनेमा हिंदी भाषेत असल्यामुळे दिग्दर्शकाला यावर जास्त लक्ष देण्याची गरज वाटलेली नाही.
सिनेमासाठी प्रियांकानं घेतलेली मेहनत स्पष्टपणे पडद्यावर दिसते. खासकरून, लग्न आणि मुलांमध्ये गुंतल्यानंतर आपली बॉक्सिंगसोबतच्या आयुष्याची पुन्हा आठवण काढताना तिनं व्यक्त केलेला राग प्रेक्षकांना भावतो. हे सगळे सीन्स प्रेक्षकांच्या मनात बसतात. प्रियांकाची गणती चांगल्या अभिनेत्रींमध्ये का होते, हे हा सिनेमा पाहताना सारखं समोर येत राहतं.
मेरी कोमच्या पतीच्या रुपात दर्शन कुमारला फारच कमी सीन मिळालेत. पण, त्यातही दर्शन प्रेक्षकांना भावतो. मेरीच्या कोचची भूमिका निभावणाऱ्या सुनील थापांनीदेखील चांगला अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो.
म्युझिक
स्पोर्टसवर आधारित या सिनेमात एकही उत्साह वाढवणारं गीत नाही... गीत-संगीतही साधारणच आहे. ‘दिल ये जिद्दी है’ हे गाणं कदाचित गुणगुणत तुम्ही सिनेमागृहाबाहेर पडू शकाल.
दिग्दर्शन
एक उत्तम कथानक हातात असूनही दिग्दर्शक उमंग कुमार त्यात फारसा रंग भरू शकलेले नाहीत. परंतु, सिनेमात स्वाभाविक रुपात संवाद संवेदनशील आणि महिला सशक्तीकरणाविषयी भाष्य करताना दिसतात. पण, त्याचा प्रभाव फारसा जाणवत नाही.
शेवटी काय तर...
या विकेन्डचा सिनेमाचा चांगला ऑप्शन किंवा मेरी कोम आणि प्रियांकानं इथवर पोहचण्यासाठी घेतलेली मेहनत पाहायची असेल तर जरूर हा सिनेमा तुम्ही पाहू शका.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.