मुंबई : ते तिघे मित्र... एकाच कॉलेजातले... एकाच कट्ट्यावर गप्पा मारणारे... एकत्रच कॉलेजमध्ये एकांकिका, नाटकं गाजवणारे... आणि एकत्रच स्ट्रगल करणारे... मात्र, तिघेही आता हिरो झालेत... ही आहे मराठीतली त्रिमुर्ती...
जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव आणि प्रियदर्शन जाधव... मैत्रीचं हे त्रिकूट... मुंबईतल्या रुपारेल कॉलेजच्या कट्ट्यावर जमलेली ही मैत्री. मात्र गेल्या दहा बारा वर्षात क्षेत्र एक मात्र प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा होता. जितेंद्र जोशी अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत स्थिरावलाय. तर सिद्धार्थ जाधवची गाडीही सध्या फॉर्मात आहे. तर या त्रिकुटातला तिसरा मित्र म्हणजे प्रियदर्शन जाधव...
एकांकिका, नाटकं, मालिका, रिएलिटी शोजच्या माध्यमातून प्रियदर्शनची खटपट सुरू होती. मात्र टीपी टू झळकला आणि जणूकाही एका प्रकारे स्ट्रगल एका क्षणार्धात थांबला असं झालं. टीपी टूला प्रेक्षकांची मिळालेली पसंती आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक झालेलं कलेक्शन याचा आनंद तर प्रियदर्शनला आहेच. मात्र त्याहीपेक्षा आमचा दर्शन आता हिरो झाला, अशी या मित्रांची मिळालेली कौतुकाची, प्रेमाची आणि आपुलकीची दाद त्याच्यासाठी सर्वस्वी समाधानाची आणि आनंदाची ठरलीय.
मित्रांच्या या दिलखुलास, आपुलकीच्या भावनेने, हेच मित्र आपल्या वाटचाली मागे उत्साह-आत्मविश्वास वाढवतात असं दर्शन म्हणतो.
एवढे दिवस नाटकांमध्ये रमणाऱ्या दर्शनने आता सिनेमाची इनिंग तिही दणक्यात सुरू केलीय. यशाची हीच गुढी भविष्यातही पहायला मिळेल, आणि या मैत्रीचे धागे असेच टीकून राहतील यासाठी या मित्रांना शुभेच्छा देऊया...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.