फिल्म रिव्ह्यू : बाळासाहेबांच्या आवाजातलं 'बाळकडू'

बाळकडू हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत आहे. त्यामुळेच या सिनेमातून सतत बाळासाहेबांचा विचार पहायला मिळतो.

Updated: Jan 23, 2015, 05:39 PM IST
फिल्म रिव्ह्यू : बाळासाहेबांच्या आवाजातलं 'बाळकडू' title=

 

सिनेमा : बाळकडू
दिग्दर्शक : अतुल काळे
कलाकार : उमेश कामत,  नेहा पेंडसे, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, हृदयनाथ राणे आणि रमेश वाणी

मुंबई  : रॉयल मराठी एंटरटेंमेन्ट निर्मीत अतुल काळे दिगदर्शित आणि उमेश कामत स्टारर बाळकडू हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. बाळकडू हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत आहे. त्यामुळेच या सिनेमातून सतत बाळासाहेबांचा विचार पहायला मिळतो. मराठी माणासांवर होणार अन्याय दूर करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापणा केली आणि पुढच्या काळात मराठी माणसांच्या मनात शिवसेनेनं वेगळं स्थान निर्माण केलं. अन्याविरुद्घ दंड थोपटण्याचं बळ बाळासाहेबांनी आपल्या विचारातून दिलं.

कथानक
मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व टीकून राहावं, यासाठी बाळासाहेब आयुष्यभर आग्रही होते. बाळासाहेबांच्या याच विचारांवर बाळकडू बेतलेला आहे. या सिनेमाची कथा मुंबईतील लालबाग परळ या मराठी बहुल परिसरात घडते. सिनेमाचा नायक आहे बाळकृष्ण पाटील नावाचा तरुण... 

अभिनेता उमेश कामतने ती भूमिका साकारली आहे. रोजच्या धकाधकीच्या जवीन त्याला अनेक अडचणींना समोरं जावं लागतं. तसेच त्याच्यावर अन्याय होतो. मराठी म्हणून त्याला हिणवलं जातं तेव्हा अशी काही परिस्थिती निर्माण होते आणि मग त्याचवेळी एक आवाज त्या तरुणातील मराठी अस्मिता जागी करतो... तो आवाज आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा... आणि तो आवाज हाच या सिनेमाचा युएसपी आहे... तेच 'बाळकडू' देण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आलाय. 

अभिनय 
उमेश कामतनं बाळकडू या सिनेमात एका बाळकृष्ण पाटील या सामान्य मराठी तरुणाची भूमिका साकारली आहे. पेशाने शिक्षक असलेला हा बाळकुष्ण पाटील उमेशने छान रंगवला आहे. बाळासाहेबांशी संवाद साधताना चेहऱ्यावरचे भाव एक्स्प्रेस करण्यात तो यशस्वी झाला आहे. शिवसेनाप्रमुखांचा तो आवाज ऐकताना मराठी माणसांच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.

उमेशच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं फिल्मी करीयर तसं फार मोठं नाही, त्यामुळे बाळकडू हा सिनेमा त्याच्या फिल्मी करीयरला वेगळं वळण देणारा ठरु शकतो.

अभिनेत्री नेहा पेंडसेनं साकारलेली सई एक मॉडर्न काळातली स्मार्ट आणि स्वावलंबी अशी मुलगी आहे.. उमेश कामतवर सिनेमा पुर्णपणे केंद्रीत असल्यामूळे नेहाला अभिनयासाठी फार स्कोप नसल्याचं जाणवतं. पण, तिच्या वाट्याला जो रोल आला आहे तो तिने चांगल्या पद्धतीने साकारला आहे... एक मराठी मुलगी जी खूप मॉडर्न आहे पण बाळासाहेबांबद्दल तिच्या मनात प्रचंड आदर आहे. काही सीन्समध्ये भारीभक्कम संवादही नेहाच्या वाट्याला आलेत आणि तिनं त्या प्रत्येक सीनला न्याय दिलाय.

प्रसाद ओकनं पार पाडलेली भूमिका ही नेगेटीव्ह असली तरी तो भाव खाऊन जाते. त्याची बॉडी लँग्वेज, त्याची संवाद फेकीची शैली या सगळ्यागोष्टींमुळे त्याचं कॅरेक्टर उठून दिसतं. 'बाळकडू'मधला प्रसादचा अभिनय लाजवाब आहे.

दिगदर्शन
अतुल काळे यांनी बाळकडूचं दिगदर्शन केलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत हा सिनेमा असल्यामुळे हा सिनेमा करताना दिग्दर्शक म्हणून अतुल काळे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. या सिनेमाला देण्यात आलेली संपूर्ण ट्रीटमेंट पाहता खरंतर सिनेमा कदाचित आणखी दमदार झाला असता असं जाणवतं. कारण, हा सिनेमा शिवसेना प्रमखांच्या विचारांचा वारसा सांगणारा असल्यामुळे दिग्दर्शकाडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, सिनेमात काही ठिकाणी उणीवा राहून गेल्या आहेत. पण, ओव्हर ऑल जो मेसेज सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाला द्यायचा होता तो देण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.

शेवटी काय तर... 
'मी शिवाजी राजे बोसले बोलतोय' या सिनेमात ज्या प्रकारे प्रत्यक्ष शिवाजी महाराज पडद्यावर प्रकट होऊन सामान्य मराठी माणसाला आपल्या अस्मितेची जाणीव करुन देतात तसाच काहीसा प्रयोग बाळकडूत पहायला मिळतो. मात्र, फरक एव्हढाच की या सिनेमात केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पात्र कुठेच दिसत नाही. मात्र, ऐकायला मिळतो तो त्यांच्यासारखा आवाज... त्यामुळेच, आम्ही देतोय या सिनेमाला तीन स्टार्स 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.