मुंबई : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली - 2'नं बॉक्स ऑफिसवरचे जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचलाय. या सिनेमाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शकासोबतच सिनेमाच्या कलाकारांनाही जातं... या सिनेमासाठी खास मेहनत घेतलीय ती सिनेमाच्या मुख्य अभिनेत्यानं म्हणजेच प्रभासनं...
एका मुलाखतीत बोलताना राजामौली यांनी 'बाहुबली' ही भूमिकाच प्रभासला डोक्यात ठेवून लिहिण्यात आल्याचं म्हटलंय. अनुष्का, शिवगामी आणि कटप्पा यांच्या भूमिकांवर आधारित कलाकारांची निवड करण्यात आली... परंतु, प्रभासबद्दल असं नव्हतं... ही भूमिका केवळ आणि केवळ त्याच्यासाठीच लिहिण्यात आली होती, असं राजामौली यांनी म्हटलंय.
आम्ही, प्रभासनं आणि मी दहा वर्षांपूर्वी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं... आणि आम्ही खूप चांगले मित्र बनलो होतो. आम्ही दिवस-रात्र, तासनतास बडबडत होतो... केवळ बाहुबलीवरच नाही तर सिनेमा तयार करण्याच्या सर्व मुद्यांवर आम्ही चर्चा करत होतो, असंही त्यांनी सांगितलंय.
प्रभास या सिनेमात फारच गुंतला होता, असंही राजामौली यांनी म्हटलंय. मी जेव्हा या सिनेमासाठी प्रभासकडे दीड वर्षांच्या तारखा मागितल्या तेव्हा तो हसला आणि तुम्ही हा सिनेमा इतक्या कमी वेळेत बनवू शकणार नाहीत... असं म्हणत पुढची पाच वर्ष त्यानं या सिनेमाला समर्पित केली... भूमिकाही लिहिल्या गेल्या नव्हत्या तेव्हापासून प्रभास या प्रोजेक्टचा भाग होता, अशी आठवण राजामौली यांनी कथन केली.
प्रभासनं या सिनेमासाठी आपल्या आयुष्यातले पाच वर्ष समर्पित केलेत. बाहुबली - द बिगिनिंग आणि बाहुबली - द कन्क्लुजन या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांसमोर येण्यासाठी पाच वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागलाय. या दरम्यान प्रभासनं कोणताही दुसरा प्रोजेक्ट हाती घेतला नव्हता. सोबतच प्रभासनं करोडोंच्या जाहिरातींनाही स्वत:पासून दूरच ठेवलं.