मुंबई : सुप्रसिद्ध संगीतकार जोडगोळी अजय-अतुल यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि अजय-अतुल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
झी मराठी ही वाहिनी अल्फा होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. अजय अतुल हे अशोक पत्की यांचा मान ठेवतात, त्यांना गुरू स्थानी मानतात हे दिसत आहे. अल्फा गौरव पुरस्कार सोहळ्यात नाटक विभागात सर्वोत्कृष्ठ पार्श्वसंगीतासाठी अजय अतुल यांना पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांनी स्टेजवर जाण्यापूर्वी अशोक पत्की यांच्या पाया पडले आणि मग पुरस्कार स्वीकारला.
यात विशेष म्हणजे अशोक पत्की यांनाही नामांकन होते. पण पुरस्कार मिळाला अजय-अतुल यांना, त्यावेळी आपल्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास ते विसरले नाही..
‘अजय - अतुल यांना केलेल्या मदतीची जाण नाही. स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांच्यासह मी त्या दोघांना खूप मदत केली, पण आता ते साधी ओळखही दाखवत नाहीत. अजय-अतुल कृतघ्न आहेत,’ अशी जहरी टीका ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी रविवारी केली.
प्रख्यात रंगकर्मी प्रशांत दामले यांनी या कार्यक्रमात पत्की यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीच्या ओघात दामले यांनी अजय - अतुल यांच्याबद्दल पत्की यांना प्रश्न विचारला आणि पत्की यांनी आपल्या मृदू शैलीत त्या दोघांवर कठोर शब्दांत बोचरी टीका केली.
अजय अतुल त्यावेळी गरज होती तेव्हा ओळख दाखवत होते. पण आता त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांना विसर पडला असल्याचा आरोप पत्की यांनी केला होता. याबाबत अजूनही अजय-अतुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
पत्की म्हणाले, ‘अजय - अतुल सुरुवातीच्या काळात माझ्या घरी येऊन जेवण करायचे. त्यांना अन्न - पाणी - निवारा सुरुवातीच्या काळात मी दिला. पुण्याचे रेकॉर्डिस्ट प्रमोद चांदोरकर यांनी त्यांना मुंबईला आणले. ते मला म्हणाले, हे दोघे होतकरू आहेत. तुमच्याकडे त्यांना राहू द्या. तुमच्याकडून ते काही चांगले शिकतील. चांदोरकर यांच्या शिफारशीमुळे मी माझ्याकडच्या अॅरेंजर्सला बाजूला करून अजय - अतुल यांना मदत केली. त्यांना जेवण - खाण दिले. मीच नाही तर स्वप्नील बांदोडकर, अवधुत गुप्ते यांनीही त्यांना मदत केली.
स्वप्नीलने तर काही दिवस त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. मी, स्वप्नील, अवधुत यांनी या दोघांना सुरेश वाडकर यांच्या स्टुडिओत जागा दिली. हे वाडकर यांना माहिती नव्हते. स्टुडिओतील काम झाल्यावर रात्री दहानंतर या आणि सकाळी दहाच्या आत निघून जा असे त्यांना आम्ही सांगितले होते.’