www.24taas.com, वृत्तसंस्था, पॅरिस
२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.
स्विर्त्झलँडच्या फॉरेंसिक विभागानं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अराफात यांच्या कबरेतून त्यांच्या शरीरातून घेतलेल्या सॅम्पलचा अभ्यास केला होता. या तपासातून हा निष्कर्ष निघाला की, पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या झालीय.
मिळालेल्या माहितीनुसार लॉसने युनिवर्सिटी हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ रेडिएशन फिजिक्सच्या तज्ज्ञांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रामल्ला शहरात असलेल्या अराफात यांची कबर खोदली. त्यातून काही सॅम्पल घेऊन त्यांचा अभ्यास केला. जिनिव्हामधील फॉरेंसिक तज्ज्ञांसोबत काल भेट घेतल्यानंतर सुहा अराफात यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, शास्त्रज्ञांच्या तपासातून हे स्पष्ट झालंय की, यासिर अराफात यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, त्यांची हत्या झाल्याचे पुरावे आहेत.
अराफात यांच्या हत्येसाठी सुहा यांनी कोणता देश किंवा व्यक्तीला जबाबदार धरलं नसलं तरी त्या म्हणाल्या माझ्या पतीचे अनेक शत्रू होते. अराफात यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्याबाबत शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांच्या हत्येमागे इस्राईलचा हात असल्याचा संशय आहे, ज्यांनी अडीच वर्ष अराफात यांना रामल्ला इथल्या मुख्यालयात नजरकैदेत ठेवलं होतं.
दरम्यान, इस्राईल सरकारनं अराफात यांच्या हत्येत आपला कोणताही हात नसल्याचं म्हटलंय. अराफात हे ७५ वर्षांचे होते, त्यांची तब्येतही बरी राहत नव्हती, असं इस्राईल सरकारचं म्हणणं आहे. अराफत यांची हत्या ‘पोलोनियम-२१०’ दिल्यानं झालाय असं, कतारमधील अल-जजीरा या टीव्ही चॅनेलनं पहिल्यांदा आपल्या तपासात म्हटलं होतं. त्यानंतर ऑगस्ट २०१२पासून फ्रान्सच्या तपासाअधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.