www.24taas.com, झी मीडिया, पेन्सिल्वेनिया
अवघ्या १९ वर्षांच्या मिरांडा बार्बर या मुलीनं आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात तब्बल १०० पेक्षा जास्त लोकांचा खून केल्याचं म्हटलंय. तिच्या या कबुलीजबाबानं अनेकांना आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. याअगोदर तिनं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत २२ जणांचा खून केल्याची कबुली दिली होती. २२ जणांच्या हत्येनंतर आपण मोजणीच सोडून दिल्याचंही तिनं म्हटलंय.
मिरांडा आणि तिचा पती इलियट बार्बर या दोघांवर ट्रॉय लाफरेरा नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप करण्यात आलाय. लाफरेरा याची हत्या गेल्या नोव्हेंबर महिन्यात झाली होती. लाफरेरा आणि मिरांडा-इलियटची भेट एका वेबसाईटच्या माध्यमातून झाली होती. आपल्या आनंदासाठी आणि पैशांसाठी आपण लाफरेराची हत्या केल्याचं मिरांडानं कबूल केलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या पुढच्या सीटवर लाफरेरा आणि मिरांडा बसलेले होते. मिरांडाच्या पतीनं लाफरेरा याच्या गळ्यावर रस्सी आवळून त्याची हत्या केली. मिरांडा-इलियट यांनी आणखी काही जणांच्या हत्येचा कट रचला होता.
दोषी सिद्ध झाल्यानंतरही आपल्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी मिरांडानं विनंती केलीय. फाशी क्रूर आणि अमानवीय असल्याचं मिरांडाचं म्हणणं आहे.
मिरांडाच्या म्हणण्यानुसार, तिला जणू काही हत्या करण्याचा आजार जडला होता. ती आपल्याजवळ तिचा आवडता चाकू ठेवत असे. या चाकूनंच तिनं अनेकांची हत्या केल्याचं समोर आलंय.
मिरांडानं हत्येची कबुली देताना, आपण केवळ वाईट लोकांचा जीव घेत असल्याचं म्हटलंय. लहान मुलांचं शोषण करणाऱ्या किंवा त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या कित्येकांचा खून केल्याचं तिनं कबूल केलंय. अशा लोकांना पाहिल्यावर माझा माझ्यावरच ताबा राहत नसे, असंही तिनं म्हटलंय. जेलमधूनच दिलेल्या मुलाखतीत मिरांडानं, आपण अलास्का, टेक्सास, नॉर्थ केरोलिना आणि कॅलिफोर्निया या भागात जवळजवळ २२ खून केले.... त्यानंतर मात्र आपण आकडाच लक्षात ठेवणंच सोडून दिलं... आणि त्यानंतरही अनेकांना यमसदनी धाडलं... ही संख्या जवळजवळ १०० पर्यंत जाईल, अशी कबुली खुद्द अवघ्या १९ वर्षांच्या मिरांडानं दिलीय.
का जडला होता मिरांडाला `हत्या करण्याचा` आजार
अवघ्या चार वर्षांची असताना मिरांडा लैंगिक शोषणाची शिकार ठरली होती. एका समुदायाशी जोडली गेल्यानंतर तिला गर्भधारणाही झाली होती. परंतु, या समुदायातील लोकांनी तिला भूल देऊन घरीच तिचा गर्भपात घडवून आणला. यानंतर मिरांडा ही पती इलियटसोबत अलास्काहून उत्तर कॅरोलिना निघून गेली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिरांडा हिला एक मुलगीही आहे. इतक्या लहान वयात इतकं काही पाहिलेल्या मिरांडाला यामुळे हत्या करण्यात काहीही वावगं वाटत नव्हतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.