www.24taas.com , झी मीडिया , नवी दिल्ली,
भारतीय वंशाचे सत्या नाडेला कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी `मायक्रोसॉफ्ट`चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. गेल्या २२ वर्षांपासून नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये जोडले गेलेले आहेत.
`ब्लुमबर्ग न्यूज`नं दिलेल्या माहीतीनुसार, मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ स्टीव्ह बालमर यांच्याजागी मूळ भारतीय असलेल्या ४७ वर्षीय सत्या नाडेला यांची निवड होणार आहे. स्टीव्ह बालमर यांच्या मते मायक्रोसॉफ्टला तरूण सीईओची गरज आहे.
`ब्लुमबर्ग`च्या रिपोर्टनुसार नाडेला यांची मायक्रोसॉफ्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून यापूर्वीच नियुक्ती करण्यात आलीय. २०११ पूर्वी नाडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ऑनलाईन सेवेच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपाध्यक्ष म्हणून तसंच मायक्रोसॉफ्टच्या बिझनेस विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. `मायक्रोसॉफ्ट`ची या संदर्भातील बैठक गुरूवारी पार पडली. शुक्रवारी नाडेला यांचे नाव मायक्रोसॉफ्टकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
हैदराबाद या ठिकाणी जन्मलेले सत्या नाडेला यांचे शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. नाडेलांनी मणिपाल विश्वविद्यालयातून `इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन` या विषयात इंजिनिअरींग पदवी प्राप्त केलीय. अमेरिकेच्या विस्कांसिन विश्वविद्यालयातून नाडेला यांनी `मास्टर ऑफ सायन्स` ही पदवी मिळवलीय. तर शिकागो विश्वविद्यालयातून नाडेला यांनी `एमबीए` पूर्ण केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.