www.24taas.com, झी मीडिया, लंडन
ब्रिटनमधील शाही टाकसाळीत सध्या चांदीची नाणी पाडण्याचे काम सुरू आहे. ज्या चांदीपासून ही नाणी तयार केली जात आहेत, ही चांदी ७0 वर्षांपूर्वी भारतातून आणलेल्या जहाजातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे जहाज १९४१ साली जर्मनीच्या यू बोटीने बुडविले होते. या जहाजासोबत ८0 भारतीय आणि ब्रिटिश खलाशांना जलसमाधी मिळाली होती.
१९४१ साली कोलकाता शहरातून एसएस गैरसोप्पा हे जहाज २८00 चांदीचे बार घेऊन इंग्लंडला जात होते. मात्र जर्मनीच्या नाझी पाणबुडीने आयरीश किनार्यावर १७ फेब्रुवारी १९४१ रोजी हे जहाज बुडवण्यात आलं होतं.
हे जहाज ७0 वर्षे पाण्याखाली होते. पण २0११ साली आयरीश किनार्यापासून ४६0 कि.मी. अंतरावर ५ कि.मी. खोलीवर हे जहाज सापडले. टायटॅनिक जहाजापेक्षाही हे जहाज अर्धा मैल जास्तच खोलीवर जाऊन बसले होते.
सागरी इतिहासातील सर्वाधिक खोलीवरची बोट काढण्याचे काम अमेरिकेच्या ओडिसी मरीन एक्सप्लोरेशन या कंपनीला देण्यात आले होते, या कंपनीने समुद्राच्या तळाखालून चांदी वर काढली.
या चांदीचा काही भाग शाही टाकसाळीत पाठविण्यात आला, तसेच शुक्रवारपासून चांदीची नाणी पाडण्याचे काम चालू झाले आहे. नाण्यावर एसएस गैरसोप्पा हे नाव कोरण्यात आले आहे.
या टाकसाळीत अशी २0 हजार नाणी पाडली जाणार असून, प्रत्येक नाण्याची किंमत ३0 पौंड आहे. या नाण्याच्या दुसर्या बाजूला ब्रिटनचे पारंपरिक डिझाईन आहे, या चित्रात फिलीप नाथन समुद्राकडे पाहतानाचे दृश्य दाखवण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.