पाकिस्तानात अल्पवयीन हिंदू मुलीचा बलात्कार करून खून

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम यार खान जिल्ह्यात राहणाऱ्या एका चिमुरडीवर हा प्रसंग ओढावलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 5, 2014, 12:38 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लाहोर
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम यार खान जिल्ह्यात राहणाऱ्या एका चिमुरडीवर हा प्रसंग ओढावलाय.
गुरुवारी आपल्या घरासमोर खेळता खेळता ही चिमुरडी अचानक गायब झाली. कुटुंबीयांच्या ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत याची तक्रार नोंदवून मदत मागितली.
मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घरच्यांनी तिला हुडकून काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण, तिचा पत्ता लागला नाही. रविवारी, काही कुटुंबीयांना मुलीचं प्रेत शेतात सापडलं. पोलिसांनी तिचं शव ताब्यात घेऊन खानपूरस्थित हॉस्पीटल गाठलं. यावेळी इथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांनी मुलीचं पोस्टमॉर्टेम करण्यास चक्क नकार दिला. यावेळी, मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्पीटलच्या बाहेरच आंदोलन केलं.
त्यानंतर, स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टरांनी या मुलीचं पोस्टमॉर्टेम केलं. यामध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचं उघड झालं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बलात्कार होतानाच मुलीचा मृत्यू झाला असावा. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
पाकिस्तानातील बहुसंख्य हिंदू दक्षिण सिंध प्रांतात राहतात. या ठिकाणी अल्पसंख्यांक समुदायाच्या महिलांचं कथित अपहरण आणि जबरदस्तीनं धर्म परिवर्तनाच्या अनेक घटना घडल्यात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.