इस्लामाबाद: इस्लामाबादमध्ये झालेल्या सार्क देशांच्या परिषदेत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. दहशतवादाचं उदात्तीकरण केलं जाऊ शकत नाही, अतिरेक्यांना पोसणाऱ्या राष्ट्रांचा केवळ निषेध करून भागणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं सिंग म्हणाले.
पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हिसबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याचा शहीद असा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात जाऊनच सिंग यांनी शरीफ यांचे कान उपटले. एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसऱ्या देशासाठी शहीद असू शकत नाही, असं राजनाथ सिंग म्हणाले. यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी परिषद संपल्यावर सिंग यांना निरोप न देताच काढता पाय घेतला.
त्यानंतर पाकिस्तानच्या या उद्दामपणाला चोख प्रत्यु्त्तर देत सिंग यांनी पाकिस्तानी गृहमंत्र्यांच्या मेजवानीकडे पाठ फिरवली आणि हॉटेलमध्ये आपल्या अधिकाऱ्यांसह जेवण केलं. दिल्लीत परतल्यावर सिंग यांनी या दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चाही केली आहे.