www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एकीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत असताना दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधला शांती-संदेशांचा सिलसिला मात्र सुरूच आहे. दरम्यान, शरीफ यांनी पाठवलेल्या पत्राला मोदींनी उत्तर पाठवलंय. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याची आपल्याला आशा असल्याचं मोदींनी या पत्रात म्हटलंय.
शरीफ यांच्यासोबत पत्रप्रपंच सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी नवे लष्कर प्रमुख जनरल बिक्रम सिंग यांची भेट घेतली. देशांतर्गत सुरक्षा आणि सीमासुरक्षेच्या मुद्द्यावर सिंग यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. या बैठकीला संरक्षणमंत्री अरूण जेटलीही उपस्थित होते. ही भेट औपचारिक होती. देशाच्या एकूणच सुरक्षा मुद्द्यांवर यात चर्चा झाल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
कराची विमानतळावर अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मोदी यांनी निषेध केला असून, या हल्ल्यात जे निरपराध ठार झाले त्यांच्याबाबत सहवेदना व्यक्त केली आहे. दरम्यान, मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी शरीफ भारतात आले होते.
पूँछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
एकीकडे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सहकार्याची भाषा केली असतानाच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूँछ क्षेत्रात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय लष्कराने जशासतसे उत्तर दिले.
संरक्षणमंत्री जेटली सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या भेटीवर येत असताना पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी तुकडय़ांनी ८१ मि.मी.च्या उखळी तोफांचा मारा भीमबेर गली केरी-मेढर भागात केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.