हताश पाकिस्तान : 'बुलेटीन'मध्येच हमसून हमसून रडली न्यूज अँकर!

पेशावरच्या आर्मी शाळेवर सात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ चिमुरड्यांसहीत १४१ जणांची क्रूर हत्या करण्यात आलीय. या घटनेनं संपूर्ण पाकिस्तानातली सामान्य जनता हताश झालीय. 

Updated: Dec 21, 2014, 11:46 AM IST
हताश पाकिस्तान : 'बुलेटीन'मध्येच हमसून हमसून रडली न्यूज अँकर! title=

नवी दिल्ली : पेशावरच्या आर्मी शाळेवर सात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३२ चिमुरड्यांसहीत १४१ जणांची क्रूर हत्या करण्यात आलीय. या घटनेनं संपूर्ण पाकिस्तानातली सामान्य जनता हताश झालीय. 

पाकिस्तानमधली परिस्थिती काही केल्या आता सुधारू शकणार नाही, असंच जणू इथल्या नजरा सांगतायत. पेशावरच्या प्रत्येक गल्लीत 'मातम' दिसून येतोय... हीच सगळी दृश्यं आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगभर पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका न्यूज बुलेटीन अँकरलाही ही दृश्यं पाहून आपल्या अश्रुंना आवर घालता आला नाही... ती इतकी भावूक झाली की, कॅमेऱ्यासमोरच ती हमसून हमसून रडली... 

पाकिस्तानच्या 'एआरवाय' न्यूज चॅनलची अँकर सनम बलोच पीडितांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या भावना समजून जगासमोर आणत होती... हातात मेणबत्ती घेऊन सनम मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली देण्यासाठी एका कार्यक्रमात सहभागी होऊन लोकांशी संवाद साधत होती. पण, या घटनेनं पुरतं हादरून गेलेल्या सनमला आपली हताश परिस्थिती लपवणं केवळ अशक्य झालं... आणि तीनं आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

'तुम्ही बोलत आहात... पण, आपल्या कितीती कळ्या कुणीतरी खुडून टाकल्यात... आपल्या मनाला दिलासा देतोयत, आपल्याच समजावतोयत, सगळं काही ठीक होईल... खूप रडलो, आकांडतांडव केला.... आज मी ठरवलंय किंबहुना कालपासून विचार करतेय की ओरडणं गरजेचं आहे? आकांडतांडव गरजेचा आहे? तुमची शांतताच सर्वात मोठी आरोळी असते... तुमची शांतता जो व्यक्ती ऐकू शकतो तो तुमच्या शब्दांना नाही समजू शकत. मी प्रयत्न करीन, पण मी अगतिक आहे... मला इथं बोलावंच लागेल... पण, आज मी शांत राहणार आहे... आज मी ओरडणार नाही... कोण चुकीचं कोण बरोबर... काही नाही... फक्त प्रार्थना करीन त्या पालकांना हिंमत देण्याची... आज तर मला 'मुश्तकबिल'कडूनही (भविष्य) कोणतीही आशा उरलेली नाही... काही दिवसांनंतर अशाच पद्धतीनं मेणबत्त्या जाळून आपण बसलेले असू...' असं म्हणताना सनम इतकी भावूक झाली की तिला अश्रू रोखणं कठिण झालं. 


हताश पाकिस्तान

'मला माफ करा... पण आज मी हताश आहे... आज मला पहिल्यांदाच वाटतंय की आता काहीही चांगलं होणार नाही... जर व्हायचंच असतं तर ते आज झालं असतं... आज मला असं कुणाच्यातरी आठवणीत मेणबत्त्या जाळत बसावं लागलं नसतं... ही अगतिकता आहे... आज मी पहिल्यांदा हताश आहे... आज मला माझ्या भविष्याकडूनही कोणतीही अपेक्षा नाही' असं म्हणत सनम धाय मोकलून रडली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.