ओबामा जिंकणार, दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये करणार?

कोट्यवधी अमेरिकन नागरिक येत्या काही तासांतच जगाचं लक्ष लागलेल्य़ा अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जातायेत.

Updated: Nov 6, 2012, 01:05 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
कोट्यवधी अमेरिकन नागरिक येत्या काही तासांतच जगाचं लक्ष लागलेल्य़ा अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जातायेत. डेमोक्रेटीक पक्षाक़डून बराक ओबामा तर रिपब्लिकन पक्षाकडून मीट रोम्नी निवडणूक रिंगणात आहेत. मतदानात आठ राज्यं निर्णायक आहेत. यातलं ओहयो राज्य अधिक महत्वाचं मानलं जातय. ओहयो राज्यातला कल पाहता यावेळीही इथले आफ्रो अमेरिकन, हिस्पॅनिक्स तरुण ओबामांच्याच मागं उभे राहतील असा अंदाज आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ओबामांनी आघाडी घेतलीय.
ओबामांना 49 टक्के तर रोम्नी यांना 47 टक्के पसंती मिळालीये. सुरुवातीला ही निवडणूक अगदीच एकतर्फी होणार अशी चर्चा होती. मात्र प्रचाराच्या पहिल्या फेरीत जेव्हा नवख्या रोम्नी यांनी ओबामांवर आघाडी घेतली. तेव्हा मात्र ओबामांच्य़ा तंबूत घबराट निर्माण झाली होती. निष्पक्षः असलेले अमेरिकन पोलपंडितांमध्येही चलबिचल निर्माण झाली होती. रोम्नी यांना खरेतर अमेरिकेचं अध्यक्षपद नजरेच्या टप्प्यात आल्यासारखं वाटलं होतं. मात्र याचकाळात आलेल्या सँडी वादळानं रोम्नींची प्रचारातली आघाडी धुळीला मिळवली.
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुल्यबळ वाटलेले रोम्नी या वादळामुळं शर्य़तीतूनच मागं पडल्याचं चित्र निर्माण झालं. सँडीमुळं अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरच्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या संकटाचा ओबामा प्रशासनानं यशस्वीपणं सामना केला. सँडीच्या संकटातही सरकार आहे, प्रशासनाचं काम सुरु आहे हा संदेश पोहचवण्यात ओबामा यशस्वी झाले. त्यामुळं अमेरिकन मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला. त्यामुळं सुरुवातीला अटीतटीची वाटणारी निव़डणूक आता एकतर्फी होणार अशी चिन्ह निर्माण झालीयेत.
ओबामांनी राबवलेल्य़ा मदतकार्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही ओबामांचे कौतुक केलं. न्यू जर्सीचे रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर क्रिस क्रिस्ट्री यांनीही ओबामांच्या कामाचं कौतुक केलयं. ओबामांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणं सँडीच्या काळात प्रचार यंत्रणेची धुरा माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडं दिली. तर स्वतः बचावकार्यात झोकून दिलं. या गोष्टी ओबामांच्या पथ्यावर पडल्या. ओबामांनी अमेरिकेतल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी दिलेलं पॅकेज परिणामकारक ठरलयं. अमेरिकेतल्या मध्यंमवर्गीयांनी त्याचं स्वागत केलयं. ओबामा प्रशासनाकडून आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजना अगदीच संथ आहे ही अडचण असली तरी आरोग्य सेवेची राष्ट्रीय योजना अगदीच परिणामकारक ठरलीये. सुरुवातीला निवडणूक प्रचारात ओबामांनी रोम्नींवर वैयक्तीक टीका करण्याचा प्रय़त्न केला. मात्र त्यात त्यांना फारसं यश आलं नाही.
ओबामांनी नंतर पवित्रा बदलत अमेरिकेच्या विकासाचा २० पानी रोडमॅप मांडला. अमेरिकेच्या भविष्यातल्या बदलांवर प्रचार केंद्रीत केल्यानं ओबामांना पुन्हा आघाडी मिळाली. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक दोन व्यक्तींमधली दोन पक्षांमधली नाही, तर ही निवडणूक अमेरिकेची भविष्यातली वाटचाल कशी असेल हे ठरवणा-या दोन दृष्टीकोनांमध्ये होतेय. बराक ओबामा दरवर्षीच्या दिवाळीत व्हाईट हाऊसमध्ये दिपोत्सव साजरा करतात. पुढच्या वर्षीही ओबामा व्हाईट हाऊसमध्ये दिपोत्सव साजरा करतील असा विश्वास त्यांचे अमेरिकेतले भारतीय पाठिराखे व्यक्त करतायेत.