११० वर्षांच्या ब्रिटीश वृध्दाच्या दीर्घायुष्याचं गुपित भारतामध्ये

ब्रिटनमधील दीर्घायुषी रेग डीन यांनी २ नोव्हेंबर रोजी आपला ११०वा वाढदिवस साजरा करताना आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य उघड केलं. आश्चर्य म्हणजे या दीर्घायुष्याचं रहस्य भारतात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2012, 05:16 PM IST

www.24taas.com, लंडन
ब्रिटनमधील दीर्घायुषी रेग डीन यांनी २ नोव्हेंबर रोजी आपला ११०वा वाढदिवस साजरा करताना आपल्या दीर्घायुष्याचं रहस्य उघड केलं. आश्चर्य म्हणजे या दीर्घायुष्याचं रहस्य भारतात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
डीन हे शाकाहारी आहेत. तसंच ते मद्यपान, धुम्रपानही करत नाहीत. मात्र त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य हे नसून वेगळंच आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डीन भारतामध्ये सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरने त्यांना एक औषध पाजलं होतं. या औषधामुळे तुम्ही दीर्घायुषी व्हाल, असं त्यावेळी डॉक्टरने सांगितलं होतं. मात्र डीन यांनी तेव्हा त्यावर फारसा विश्वास ठेवला नव्हता. तसंच, ही गोष्ट त्यांनी इतरांपासूनही लपवून ठेवली होती. मात्र त्याच औषधामुळे मी इतकी वर्षं जगू शकलो, असं डीन यांचं म्हणणं आहे. आयुष्याचं शतक ओलांडून आणखी दशक गाठल्यावर डीन यांनी ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे.
११० वर्षांचे डीन यांनी एक शतकाहूनही अधिक काळ पाहिला आहे. १९०२ साली डीन यांचा जन्म झाला होता. डीन यांनी शिक्षक, सैनिक तसंच चर्च मिनिस्टर म्हणूनही काम केलं होतं. त्यांना टायटॅनिक जहाजाची जलसमाधी आठवत आहे. तसंच ग्रेट ब्रिटनच्या २६ पंतप्रधानांची कारकीर्द त्यांनी पाहिली आहे. विमानाचा शोधही त्यांच्या जन्माच्या पश्चात लागला. डीन यांना १२० वर्षं जगायची इच्छा आहे. जपानमधील ११५ वर्षं वयाचे जिरोमॉन किरोमा हे सध्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखले जातात.