www.24taas.com, झी मीडिया, दुबई
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शारजामध्ये भारताचा पंतप्रधान मुस्लिमच ठरवत असल्याचं विधान केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद यांच्या १९६ व्या स्मृतिदिन समारंभासाठी अय्यर शारजामध्ये बोलत होते.
भारतातील कुठलाही राजकीय पक्ष मुस्लिमांचा पाठिंबा मिळवल्याशिवाय आपली सत्ता स्थापन करू शकत नाही असा दावा अय्यर यांनी आपल्या भाषणात केला. मुस्लिम देशात अल्पसंख्यांक असले, तरी हे अल्पसंख्यांकच भारताचे पंतप्रधान कोण होणार, हे ठरवतात. त्यामुळे निवडणूकपूर्व काळात मुस्लिमांचं मत मिळवण्यासाठी त्यांना खूश करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, असं अय्यर म्हणाले. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात, त्यामुळे ते ज्या उमेदवाराला मतदान करतात, तो उमेदवार बहुमताने विजयी होतो असंही अय्यर यांनी वक्तव्य केलं.
मुस्लिमांच्या पाठिंब्याची सर्वच पक्षांना गरज आहे. कुठलाही पक्ष मुस्लिमांचं मत मिळवल्याशिवाय भारतात सत्ता स्थापन करू शकत नाही. मत मिळवण्यातसाठी त्यांचं लांगुलचालन करावंच लागतं अशी कबुलीही अय्यर यांनी शारजात बोलताना दिली.