क्लिंटन यांच्यासोबतच्या संबंधावर मोनिकानं सोडलं मौन

90 च्या दशकात गाजलेलं मोनिका लेविन्स्की आणि बिल क्लिंटन याचं प्रेम प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे, इतका काळ लोटल्यानंतर मोनिका हिनं याबद्दल आत्तापर्यंत बाळगलेलं मौन सोडलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2014, 01:40 PM IST

www.24taas.com, झी मिडिया, वॉशिग्टन
90 च्या दशकात गाजलेलं मोनिका लेविन्स्की आणि बिल क्लिंटन याचं प्रेम प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे, इतका काळ लोटल्यानंतर मोनिका हिनं याबद्दल आत्तापर्यंत बाळगलेलं मौन सोडलंय.
1990 च्या दशकात व्हाईट हाऊसमध्ये इंटर्न म्हणून काम पाहणाऱ्या मोनिकाचं सूत तत्कालीन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासोबत जुळलं होतं... कितीही टीका झाली तरी या अवैध संबंधांवर मोनिकानं आत्तापर्यंत मौन बाळगणंच पसंत केलं होतं. या प्रकरणामुळेच जगभरात तिची जगभरात बदनामी झाली होती. याच प्रकरणावर आता मला माझी बाजू मांडायचीय, असं म्हणत मोनिकानं पहिल्यांदाच या प्रकरणावर आपलं तोंड उघडलंय.
आता 40 वर्षांची असलेली मोनिका तेव्हा केवळ 20 वर्षांची होती. बिल क्लिंटन यांच्यासोबत खाजगी क्षणांतला तिचा निळ्या रंगाचा ड्रेस बराच गाजला होता. या संबंधांचा खुलासा झाल्यानंतर आणि जगभरातून टीका झाल्यानंतर निराशेच्या गर्तेत अडकून एकदा मोनिकानं आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर अनेक वर्ष नोकरी मिळाली नाही. त्यानंतर या महिन्याच्या ‘वैनिटी फेअर पत्रिका’मध्ये तिनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय.
‘बिल क्लिंटन यांच्यासोबत जे संबंध होते ते सहमतीनं बनवलेले होते. परंतु, माझ्या बॉसनं - बिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा घेतला. माझ्यात आणि क्लिंटन यांच्या जे काही झालं त्याबद्दल मला खूप खेद आहे... मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की त्याचा मला खूप पश्चाताप होतोय’ असं यावेळी मोनिकानं म्हटलंय.
जवळजवळ एक दशकापर्यंत तिनं मौन कायम ठेवल्यानंतर, गप्प राहण्यासाठी तिला क्लिंटनकडून मोबदला दिला गेला असेल, अशा प्रकारच्या चर्चांना ऊत आला होता. हे सगळं खोटं होतं, असं मोनिकानं स्पष्ट केलंय. ‘1998 मध्ये क्लिंटन यांच्यासोबत असलेलं प्रेमप्रकरण सर्वांसमोर आलं तेव्हा मी एक अशी महिला होते जिला जगात सगळ्यात जास्त अपमान सहन करावा लागला होता’ असंही मोनिकानं म्हटलंय
अपमान सहन केलेल्या तसंच लैंगिक छळाला बळी पडलेल्या पीडितांसाठी काम करणं आणि सार्वजनिक मंचावर या विषयावर बोलणं सुरू करणं हे आपलं उद्दीष्ट असल्याचं मोनिकानं म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.