लॉस एंजिल्स : अमेरिकेला ई-मेलवरून धमकी मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून एक हजाराहून अधिक शाळा बंद केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याचा संदेश मिळाल्यानंतर लॉस एंजिल्समधील या शाळा मंगळवारी बंद करण्यात आल्यात. या शाळांमध्ये ६,४०,००० विद्यार्थी आहेत.
शाळांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचा संदेश इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आम्हाला मिळाला, असे येथील शाळांच्या पोलीस विभागाचे प्रमुख स्टिव्हन झिपरमन यांनी सांगितले.
येथील शाळांचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी खात्री पटेपर्यंत आज आम्ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पोलीस सर्व शाळांची झडती घेत आहेत. शाळा संचालक मंडळातील एका सदस्याला ई-मेलद्वारे मिळालेला हा संदेश परदेशातून आला असण्याची शक्यता आहे.
मुस्लिम जोडप्याने कॅलिफोर्नियात १४ जणांचे हत्याकांड घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कता बाळगण्यात येत आहे. याचवेळी असा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत शाळा बंद केल्या. दरम्यान, बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर सॅन बर्नार्डिनो व्हॅली कॉलेजही मंगळवारी दुपारी बंद करण्यात आले.