www.24taas.com, इस्लामाबाद
‘मला आजही कारगिल कारवाईचा अभिमान आहे’ असं म्हणत परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या राजकारणात पुनरागमन केलंय.
चार वर्षांच्या अज्ञातवासानंतर पाकिस्तानात मुशर्रफ परतलेत. त्यांनी कराचीत पत्रकार घेतली. कारगिल युद्धात भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही मुशर्रफ यांनी मात्र आता यावर राजकारण रंगवण्यास सुरवात केलीय. १९९९ साली पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेचा भंग करत भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. याबद्दल मुशर्रफ यांना कराचीत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आपल्याला आजही कारगिल कारवाईचा अभिमान असल्याचं म्हटलंय. कारगिल युद्धादरम्यान मुशर्रफ पाकिस्तानच्या सेनाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी नवाज शरीफ यांच्यावर वर्चस्व मिळवत सत्ता आपल्या हातात घेतली आणि पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर आरुढ झाले होते.
तेच मुशर्रफ आगामी संसदीय निवडणूक प्रक्रियेत पुन्हा सहभागी होणार आहेत. ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे (एपीएमएल) नेते शाहजादा खालिद परवेज यांनी ही घोषणा केलीय. मुशर्रफ खबर पख्तूनख्वा प्रांतातील मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. इथं पक्षाचं मजबूत वोट बँक असल्यानं मुशर्रफ यांनी याच ठिकाणातून निवडणूक लढवण्याची तयारी केलीय.
जवळजवळ चार वर्ष अज्ञातवासात राहिल्यानंतर रविवारी ते पाकिस्तानात दाखल झालेत. पाकिस्तानात परतण्यासाठी आपण कोणताही ‘समझोता’ केला नसल्याचा दावा यावेळी त्यांनी केलाय. ‘देशाच्या आणि जनतेच्या हितासाठी आपण पाकिस्तानात परतलो... माझ्या कार्यकाळातच पाकिस्ताननं सर्वात जास्त प्रगती केली’ असं त्यांनी म्हटलंय.
पाकिस्तानात ११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग पार्टीचं नेतृत्व करण्यासाठी मुशर्रफ पाकिस्तानात दाखल झालेत.