www.24taas.com,झी मीडिया, न्यूयॉर्क
मानवरहित विमान ड्रोनचा जागतिक बाजार पुढील दशकात ८९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियमन बोर्डाने देशातील सहा राज्यात, ड्रोनच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी परिक्षण स्थळ निवडण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या आकाशात ड्रोन विमानांची ढगांसारखी गर्दी होणार आहे.
या नवीन योजनेनुसार अलास्का, नेवादा, न्यूयॉर्क, नॉर्थ डेकोटा, टेक्सास आणि वर्जिनिया या राज्यांमध्ये हे परिक्षण स्थळं आहेत. या योजनेत २०२५ पर्यंत ड्रोन विमानांच्या उड्डाणावर कायदे बनवण्याची तरतूद आहे. मात्र शेतकऱ्यांपासून बिल्डर ते सेवा देणारे क्षेत्रही ड्रोन आपल्याला उपयोगात आणता येईल का?, हे चाचपून पाहात आहेत.
ड्रोन वापराचे धोके काय आहेत, ते कसे टाळता येईल हे पाहिल्यानंतर दहा महिन्यांनी कोणत्या क्षेत्रात ड्रोन उड्डाणाची परवानगी द्यायची यावर निर्णय होणार आहे. शेतकऱ्यांना पिकांवरील रोग नियंत्रण करण्यासाठी किटकनाशक फवारण्यापासून, गुरांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे.
अमेरिकन पोलिसांना एखाद्या आरोपींच्या शोधासाठी तात्काळ हेलिकॉप्टरची सेवा घ्यावी लागते, यावर तासाभरात लाखो रूपये खर्च होतात. मात्र ड्रोन वापरलं तर ही सेवा त्यांना फक्त १५०० रूपयांत मिळणार आहे. ड्रोनचा वापर कायदेशीर केल्यानंतर अमेरिकेत ड्रोनची संख्या साडेसात हजारांवर जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.