www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. नोकरीवर रुजू होण्याआधीच कोणतंही काम असो... ‘हा जॉब २४ तास आहे... ९ ते ५ नाही’ असं बजावण्यास वरिष्ठ चुकत नाहीत. पण, हेच जर तुम्ही जर्मनीमध्ये काम करत असाल तर असं सांगण्याचं धाडस तुमचे वरिष्ठ करणार नाहीत. कारण जर्मनी सरकारनं तसे आदेशच जारी केलेत.
कामाची वेळ संपल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन किंवा ई-मेल करण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव जर्मनीत कामगार विभागाने मंजूर केलाय. जगभरात नोकरदार वर्गाची पिळवणूक थांबवण्यासाठी कामकाजाची ठराविक वेळ ठरवून दिलेली असते. मात्र लॅपटॉप, स्मार्टफोन्स, आयपॅड या आधुनिक इलॅक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कामकाज संपल्यावर बऱ्याच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरी गेल्यावरही काम करायला सांगितलं जातं.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ताण, डिप्रेशन असे मानिसक आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचीच परिणीती म्हणून दोन महिन्यांपूर्वी जर्मनीतील एका ख्यातनाम कंपनीतील अधिकाऱ्यानं कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यानं कामाचा ताण असह्य झाल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. या घटनेची गंभीर दखल जर्मनीच्या कामगार मंत्रालयानं घेऊन नवीन नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय.
या नियमांनुसार कामकाजाची वेळ संपल्यावर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना फोन किंवा ई-मेल करता येणार नाही. अत्यावश्यक काम असेल तरच त्यांना फोन किंवा ई-मेल करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कामाची वेळ संपल्यावर एखाद्या कर्मचाऱ्यानं फोन बंद केल्यास किंवा ईमेलला उत्तर न दिल्यास त्याला दंड आकारता येणार नाही असे या नवीन नियमावलीत नमूद करण्यात आलंय. कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कामगार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय. अशा प्रकारचा निर्णय घेणारा जर्मनी हा पहिलाच देश ठरलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.