www.24taas.com, झी मीडिया, लंडन
एकीकडे सोन्याचा भाव घसरत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दत्ता फुगे यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे. जगातील सर्वांत महागडा पोषाख परिधान करत असल्याबद्दल त्यांचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल झालं आहे. त्यांच्या अंगावरील शर्ट सोन्याचा असून साडेतीन किलो वजनाचं सोनं त्यासाठी वापरण्यात आलं आहे. या शर्टाची किंमत ६६,१५,४८१ रुपये आहे.
आजच दत्ताफुगे यांना वर्ल्ड रेकॉर्ड संदर्भात प्रमाणपत्र मिळालं. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे हे पूर्वी गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध होते. मात्र आता दत्ता फुगे याच्या अंगावरील सोन्याने विश्व विक्रमालाच गवसणी घातली आहे. गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा हा सोन्याचा अंगरखा रांका ज्वेलर्सने बनवला आहे.
सोन्याचा भाव घसरला असल्यामुळे दत्ता फुगे आता आपल्या सोन्याच्या शर्टावर आणखी सोनं मढवण्याचीही शक्यता आहे. फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे यांचं नगरसेविकापद खोटं जात प्रमाणपत्र दाखवल्यामुळे रद्द झालं आहे. यामुळे दुःखी झालेल्या फुगेंना गिनिज बुकच्या प्रमाणपत्रामुळे आनंद झाला आहे. दत्ता फुगे यांना लोकसभा निवडणुकीला उभं राहाण्याची इच्छा असून मनसेतर्फे फुगे उभे राहाण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.