www.24taas.com, झी मिडीया,बीजिंग/ दिल्ली
चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
हेलिकॉप्टर्स काही वेळ परिसरात घिरट्या मारत असल्याचंही पीटीआयनं म्हटलं आहे. त्यानंतर खाण्यापिण्याचे सामान, सिगारेटचे पॅकेट आणि चीनी भाषेतले संदेश या हेलिकॉप्टर्सनमधून फेकल्याचंही वृत्तसंस्थेनं म्हटलंय.
चीनपासून सतत होणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी भारताने लेह भागात सैन्याच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. तर चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेखेचे उल्लघन झाले नसल्याचे चीनकडून कळवण्यात येत आहे.
दरम्यान, चिनी सैनिकांनी १५ एप्रिल रोजी लडाखमधील दौलत बेग ओल्डी सेक्यरमधील ‘एलएसी’वरून भारताच्या हद्दीत सुमारे दहा किलोमीटर आत घुसखोरी केली होती. भारत आणि चिनी लष्काराच्या प्रत्यक्ष ताबारेषेवरील लष्करी अधिकाऱ्यांत या विषयावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी फ्लॅग मिटिंग झाली. मात्र या बैठकीत परिस्थीतीवर तोडगा काढण्यात अपयश आल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.