www.24taas.com, बोस्टन
बोस्टनमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा दहशतवादाचं सावट पसरलं. परंतु, हा बॉम्बस्फोट एका जोडप्याच्या लग्नाच्या निर्णयावर मात्र काहीही परिणाम करू शकला नाही.
बोस्टन मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आणि या हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या एका जोडप्याचा विवाहसोहळा बोस्टन मॅरेथॉननंतर काही तासांनी आयोजित करण्यात आला होता. डलासमध्ये राहणाऱ्या या जोडप्यानं सकाळी बोस्टन मॅरेथॉनमध्येही सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर १४० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले.
केरी जॉन्सटन आणि रॉबर्ट वाटलिंग यांनी याआधीही गेल्या कित्येक मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला आहे. शिकागो मॅरेथॉननंतर रॉबर्टनं आपल्या प्रेयसीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. बोस्टन मॅरेथॉननंतर या प्रेमाची रुपांतर लग्नामध्ये करण्याचं दोघांनी नियोजिलं होतं.
मॅरेथॉनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्याचा परिणाम सर्व ठिकाणी दिसून येत होता. मात्र, या दोघांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ठरलेल्या वेळी या दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.