तब्बल ५१५ दिवसानंतर सापडलं रहस्यमयरित्या गायब झालेलं 'एमएच ३७०' विमान

मार्च २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या मलेशिअन एअरलाईनचं जेट 'एमएच ३७०'चे अवशेष तब्बल ५१५ दिवसानंतर हाती लागलेत. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

Updated: Aug 6, 2015, 03:35 PM IST
तब्बल ५१५ दिवसानंतर सापडलं रहस्यमयरित्या गायब झालेलं 'एमएच ३७०' विमान title=

कुआलालंपूर : मार्च २०१४ मध्ये बेपत्ता झालेल्या मलेशिअन एअरलाईनचं जेट 'एमएच ३७०'चे अवशेष तब्बल ५१५ दिवसानंतर हाती लागलेत. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. 

रियनियन बेटावर मिळालेले विमानाचे अवशेष एमएच ३७० चे आहेत. विशेषज्ज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमनं याला दुजोरा दिलाय. ही बातमी मला दु:खद मनानं द्यावी लागतेय, असं नजीब रज्जाक यांनी म्हटलंय. 

पण, मलेशियाचं हे विमान कसं गायब झालं होतं? हे मात्र अद्यापही रहस्यच आहे. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रियूनियन बेटावर सापडलेल्या या विमानाच्या अवशेषांची चाचणी केल्यानंतर हे तेच रहस्यमयरित्या गायब झालेलं विमान आहे.

गेल्या आठवड्यात रियूनियन बेटावर विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हे अवशेष चाचणीसाठी फ्रान्सच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. 

एमएच ३७० हे विमान ८ मार्च २०१४ रोजी कुआलालंपूरहून बीजिंगला जाताना मध्येच गुडूप झालं होतं. गेल्या १७ महिन्यांपासून या विमानाचा शोध सुरू होता. विमानात प्रवासी आणि वैमानिकांसह एकूण २३९ लोक होते. 

चीननं मलेशियाकडे एमएच ३७० ची अधिक चौकशी सुरू ठेवण्याची याचिका केलीय. हुआ चुनियन या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेत बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबांच्या हितांचं आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारांचं संरक्षण होण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. शिवाय, दुर्घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याचाही उलगडा व्हायला हवा, यासाठी ही चौकशी सुरु राहणं गरजेचं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.