www.24taas.com, लंडन
अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलेल्या खेळांच्या कुंभमेळा असलेल्या लंडन ऑलिम्पिकला अल कायदापासून धोका असल्याचा इशारा इंग्लंडची गुप्तहेर संघटना ‘एमआय - ५’ने दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असलेल्या जिहादींचा अरब मध्य-पूर्वेतील जगतामध्येही शिरकाव झाला असल्याने ही अत्यंत काळजीची बाब असल्याचे ‘एमआय-५’चे महासंचालक जोनाथन इव्हान्स यांनी सांगितले.
पाश्चिमात्य देश आणि इस्रायल अण्वस्त्रबंदीसाठी इराणवर दबाव आणत असल्याने इराणही काळजीचा विषय असल्याचे ते म्हणाले. अरब देशांमध्ये असलेले अस्थैर्य अल-कायदासाठी पोषक ठरत असल्याचे सांगताना जिहादी गटाकडे कल असलेले ब्रिटिश नागरिक दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी अरब देशांमध्ये गेल्याचे दिसून आल्याकडेही इव्हान्स यांनी लक्ष वेधले आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तानातील अल-कायदाचे केंद्र आता येमेन, सोमालिया आणि साहेलकडे सरकल्याचे ते म्हणाले. इव्हान्स यांनी, किती ब्रिटिश नागरिकांनी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घेतले हे स्पष्ट केले नसले तरी येमेन, इजिप्त, सिरीया व लिबियामधील अतिरेक्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेल्या १०० ब्रिटिश नागरिकांवर ‘एमआय-५’ची नजर असल्याचे मानले जात आहे.