इस्त्रायलने अमेरिकेला केले नाराज

इराणच्या अणुभट्टय़ांवर हल्ला करण्यापू्र्वी अमेरिकेला बारा तासांपेक्षा अधिक वेळ इशारा न देण्याचा इस्त्रायलने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Jan 25, 2012, 02:56 PM IST

www.24taas.com, लंडन 

 

 

इराणच्या अणुभट्टय़ांवर हल्ला करण्यापू्र्वी अमेरिकेला बारा तासांपेक्षा अधिक वेळ इशारा न देण्याचा इस्त्रायलने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

अमेरिका आणि इस्त्रायलची मैत्री आखाती प्रदेशातील अरब राष्ट्रांसाठी डोकेदुखी आहे.  दोन्ही देशांच्या ६0 वर्षांच्या दोस्तीत अभावानेच असे प्रसंग आले असून, या वेळी अमेरिकेने इस्त्रायलबरोबर होणार्‍या क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रांच्या संयुक्त कवायतीही रद्द केल्यात. तर मैत्रीखातर अमेरिकेतील येत्या अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांना इस्त्रायलने पाठिंबा व्यक्त करीत अमेरिकेतील ज्यू नागरिकांना ओबामा यांना मतदान करण्याचा सल्लाही दिला आहे.

 

 

इराणने आपली अण्वस्त्रसज्जता वाढवली आहे.  त्याचा इस्त्रायलला थेट धोका संभवतो. त्यामुळे इस्त्रायल इराणच्या अणुभट्टय़ांवर हल्ला करून त्या नष्ट करू शकतो, अशी अमेरिकेला भिती वाटत आहे. त्यामुळे इस्त्रायलचा निर्णय अमेरिकेला मान्य नसल्याचे नाराजीतून स्पष्ट आला आहे.

 

 

इस्त्रायलची ३५ वी पॅराट्रुपर्स ब्रिगेड लांब पल्ल्याच्या लष्करी कारवाईची तयारीही करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. अशी लष्करी कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेला कळवले जाणार नाही, असे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्याच आधारावर इस्त्रायलचे संरक्षण मंत्री एहुद बराक यांनी अमेरिकी जनरल मार्टिन डेंपसे यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे, हल्ल्याची वेळ आल्यास अमेरिकेला फारतर १२ तास आधी सांगण्यात येईल. पण इस्त्रायलच्या एकतर्फी कारवाई करण्याच्या निर्णयाने अमेरिका नाराज झाली आहे.

 

दरम्यान,  इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे या देशाकडून तेल विकत न घेण्याचा निर्णय युरोपीय समुदायाने घेतला आहे. युरोपीय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या एका बैठकीत असाही निर्णय झाला की, इराण आपल्या आण्विक कार्यक्रमाबद्दल चर्चेला तयार झाला नाही, तर १ जुलैपासून ही बंदी अस्तित्वात येईल. इराणच्या तेल निर्यातीतील २0 टक्के हिस्सा युरोपीय देशांचा आहे. अमेरिकेने होरमुज स्ट्रॅटमध्ये काही महिन्यांपासून नौदल तैनात केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही डिसेंबरमध्ये तेथे सलग १0 दिवस आपल्या नवीन अण्वस्त्रांची चाचणी पार पाडली होती.

Tags: