नवी दिल्ली : याकूब मेमनला माफी द्यावी, यासाठी काँग्रेसचे आमदारही आता पुढं सरसावलेत. याकूबची फाशीची शिक्षा माफ करा, अशी विनंती करणारं पत्र काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी राष्ट्रपतींना पाठवलंय.
राज्यघटनेच्या कलम ७२ नुसार याकूबला माफी द्या, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामध्ये आमदार आरिफ मोहम्मद नसीम खान, अमीन पटेल, अस्लम शेख, माजी आमदार युसूफ अब्राहनी आणि नगरसेवक जावेद जुनेजा यांचा समावेश आहे.
दरम्यान, फाशीला स्थगिती देण्याच्या याकूब मेमनच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा नव्यानं सुनावणी होणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती दवे आणि कुरियन यांच्यात मतभेद झाले. दवे यांनी याकूबची याचिका फेटाळली तर कुरियन यांनी याकूबच्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात घातलेल्या घोळावर आधी निर्णय़ घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळं आता ही याचिका न्या. दीपक मिश्रा, न्या. प्रफुल्लचंद्र पंत आणि न्या. अमितवा रॉय यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढं सोपवण्यात आलीय.
हे खंडपीठ याकूबच्या याचिकेवर आज सुनावणी घेणार आहे. त्यामुळं याकूबच्या फाशीवर फैसला होणार आहे. याकूबला ३० जुलैला फाशी देण्याचा निर्णय यापूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यानुसार याकूबच्या फाशीची नागपूर जेलमध्ये तयारी सुरू आहे. मात्र आजच्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर फाशीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.