www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जाण्याची शक्यता गडद होत असताना राहुल गांधींनी मात्र यासंबंधीच्या प्रश्नांना बगल दिली आहे. मला पंतप्रधानपदाबाबत विचारणं चुकीचं असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या मते त्यांना पंतप्रधानपदाबाबत विचारणं चुकीचं आहे. याशिवाय आपल्याला काँग्रेसमध्ये असलेलं हाय कमांड कल्चरही मान्य नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. राजकीय शक्ती काही मुठभर माणसांच्या हाती राहाण्यापेक्षा अधिकाधिक योग्य माणसांकडे ती असावी, असा विचार राहुल गांधींनी मांडला आहे. पदापेक्षा पक्षाला आपलं प्राधान्य असून भविष्यात काही काळापुरताच मर्यादित न राहाता अधिक काळ पक्षाची बांधणी करण्याचा मानस यावेळी ४२ वर्षीय राहुल गांधींनी व्यक्त केला.
काँग्रेस असो वा भाजप, अधिकार शक्ती नसलेल्या खासदारांना काय वाटतं, हे मी समजू शकतो. मला मधल्या फळीतल्या खासदारांना पुढे आणायचं आहे. भारतात अनेक पक्ष आहेत ज्यांचे १,२,५ ते ६ किंवा १५-२० नेते आहेत. मला सर्वच लोकप्रतिनिधींना शक्तिशाली बनवायचं आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
आपला इतक्यात लग्न करण्याचा विचार नसल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. तसंच आपल्या आजीच्या काळात ७०च्या दशकात सुरू झालेल्या हायकमांड कल्चरवरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मला हायकमांड कल्चर मान्य नाही, मात्र मी तिच्या जागी असतो, तर मी सुद्धा त्या परिस्थितीत तिच्यासारखेच निर्णय घेतले असते, असं मत राहुल गांधींनी मांडलं.
पक्षाच्या बांधणीत अमुलाग्र बदल करण्याचा विचार राहुल गांधींच्या बोलण्यातून वारंवार सूचित होत होता. महात्मा गांधी माझे आदर्श असून भगवद् गीतेतील निष्काम कर्म संकल्पनेवर माझा विश्वास आहे असं राहुल गांधी म्हणाले. महात्मा गांधी आपले गुरू असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं