मुंबई : रविवारी पहाटे केरळमधील मंदिरात झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. कोल्लम येथील पुत्तिंगल मंदिरात झालेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पुत्तू या मल्याळम शब्दाचा अर्थ आहे डोंगर. डोंगरावर असणाऱ्या देवीचे निवासस्थान असा त्याचा अर्थ आहे. भाविकांच्या मते या मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण होते. यावेळी या मंदिरात विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीच्या स्पर्धाही घेतल्या जातात.
या मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्रीत उत्सव साजरा केला जातो. याच उत्सवादरम्यान रविवारी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धावाधावही झाली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला.