इंधन बचतीसाठी तुमची ऑफिसची वेळ ७ ते ३?

देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2013, 12:37 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय. सरकारच्या या नव्या मोहिमनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी ऑफिसला जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा लागणार आहे. हा दिवस ‘बस दिवस’ म्हणून घोषित केला जाईल. आणि यादिवशी तुम्हाला सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचाच वापर करावा लागेल.
यामुळे रस्त्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठीही सरकारकडे उपाय आहे. तो म्हणजे आता तुमच्या ऑफिसच्या वेळेतही बदल करणं... होयं, इंधन वाचविण्यासाठी आता केंद्र सरकारनं तुमच्या ऑफिसच्या वेळाच बदलण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यत्वे करून आत्तापर्यंत सरकारी कार्यालयाच्या कामकाजाची वेळ असते सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत... पण, मोईलींनी केलेल्या सुचनेनुसार यामध्ये बदल करून सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० किंवा सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत तुम्हाला काम करावं लागू शकतं.
पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधन बचतीच्या या कार्यक्रमात सुरुवातील पाच अरब डॉलरपर्यंत बचत केली जाऊ शकते. ‘मी कर्मचारी, सार्वजनिक तक्रार निवारण आणि पेन्शन राज्य मंत्र्यांना पत्र लिहून सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे ‘पीक अवर’च्या कार्यालयीन वेळेत रस्त्यांवर गर्दी कमी होईल आणि त्यामुळे इंधनाची बचत होऊ शकेल’.

गेल्या वर्षी देशात १४४.२९ अरब डॉलरचं तेल आयात करण्यात आलं होतं. या तेल बचत मोहिमेच्या प्रचारासाठी युवा खेळाडू विराट कोहली आणि सायना नेहवाल यांना पाचारण करण्यात आलंय. तसंच आधुनिक यंत्रणेद्वारे म्हणजेच स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाद्वारेही इंधन बचतीचे मार्ग लोकांपर्यंत पोहचवण्यात येतील.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.