www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडात आलेल्या जलप्रलयानं होत्याचं नव्हतं झालं. सर्व काही निसर्गाच्या या प्रलयानं हिरावून नेलं. प्रचंड जिवितहानी, वित्तहानी झाली. लाखो लोकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं. या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.
याच मदतीपैकी एक हात आला तो पुण्याचा. जिल्हा आपत्ती कंट्रोलमध्ये एक मदतीचा फोन खणाणला आणि पलीकडून अनुपम नावाच्या तरुणाचा आवाज आला. त्यानं मदतीची इच्छाही व्यक्त केली. यावेळी ‘या आपत्तीत आपल्या सगळ्या नातेवाईकांसह आपलं सर्वस्व गमावलेल्या एखाद्या पीडित मुलीशी मी विवाह करण्यास इच्छुक आहे’, असं आगळंच आर्जव या तरुणाने घातलं. अशा पद्धतीनं मदत करु पाहाणाऱ्या या मुलाचे नाव आहे अनुपम... तो त्यांच्या घरातील एकुलता एक मुलगा आहे आणि उत्तराखंडातील परिस्थितीमुळे तो खूप भावनाकूळ झालाय. लग्नाच्या निमित्ताने अनुपमला एखाद्या पीडित मुलीला आधार द्यायचाय.
असे अनेक फोन मदतीसाठी आत्तापर्यंत कंट्रोल रुमला आलेत. महाराष्ट्र, गुजरात, यूपी यांसारख्या विविध राज्यातून हे मदतीचे फोन आलेत. यातल्या एकानं ‘जर कोणत्याही पिडीत महिलेला जर कामाची गरज असेल तर आपल्या घरात नोकरी देऊ शकतो’ अशी मदत एकानं पुढं केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.