तिहारच्या कैद्याला ‘ताज’नं दिली मासिक 35,000ची नोकरी!

तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 7, 2014, 10:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर या कैद्यांना नोकरी मिळणार आहे. त्यामुळे, शिक्षेनंतर ते समाजात मानानं आपलं उर्वरित आयुष्य जगू शकतील.
‘पीटीआय’नं दिलेल्या माहितनुसार, वेदांता ग्रुप, ताज महल ग्रुप, आयडीईआयएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी तिहार जेलमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले.
ताज महल ग्रुपनं पारसनाथ या कैद्याला सगळ्यात जास्त वेतन देऊन नोकरीची ऑफर दिलीय. पारसनाथनं आठ वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये घालवलाय. त्याला ‘असिस्टंट बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर’ पद आणि 35,000 रुपये प्रति महिना पगाराची ऑफर दिली गेलीय.
पारसनाथ यानं जेलमधूनच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयातून सामाजिक कार्यात पदवी प्राप्त केलीय. ‘ 18 वर्षांचा होतो तेव्हा तुरुंगात दाखल झालो होतो. माझ्यावर हत्येचा आरोप होता. पण, माझ्या चांगल्या वागणुकीमुळे माझी शिक्षा कमी करण्यात आलीय. जेलमध्ये राहूनच पदवी मिळवली आणि आता नोकरीही मिळालीय... मला आशा आहे की मी सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसोबत न्याय करू शकेल’ असं पारसनाथनं म्हटलंय.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत एकाही महिला कैद्याचा समावेश नव्हता. याबद्दल कारण विचारण्यात आल्यानंतर जेल डिरेक्टर जनरल विमला मेहरा यांनी महिला कैद्यांसाठी वेगळी व्यवस्था केली जाईल, असं म्हटलंय. त्यांनी निवड झालेल्या सगळ्या कैद्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.