www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सुनंदा पुष्कर यांच्या पार्थिवावर लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडलेत. शिव मेनन या त्यांच्या २१ वर्षांच्या मुलानं त्यांना अग्नि दिलाय. शिव हा सुनंदा आणि त्यांचे दुसरे पती सुजिथ मेनन यांचा मुलगा आहे. सुजिथ यांचा १९९७ साली रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर सुनंदा यांनी २०१० साली शशी थरुर यांच्यासोबत विवाह केला होता.
यावेळी शशी थरुर यांची कनिष्क आणि इशान ही दोन मुलंही यावेळी उपस्थित होती. शशी थरुर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी तिलोत्तमा मुखर्जी यांची कनिष्क आणि इशान ही दोन मुलं... सुनंदा यांच्या पार्थिव शरीराला शशी थरुर आणि शिव मेनन यांनीही खांदा दिला. सुनंदा आणि शशी थरुर या दोघांचेही नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
LIVE घडामोडी
* तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी शशी थरुर यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केलीय. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून शशी थरूर सध्या कारभार पाहत आहेत. थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ रितीनं झालेल्या मृत्यू प्रकणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी नायडू यांनी केलीय.
* एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर अनेक जखमा सापडल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुनंदा यांचा मृ्तयू 'अप्राकृतिक'रित्या झालेला आहे.
* डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनंतर दिल्ली क्राईम बान्चची एक टीम पुन्हा हॉटेलमध्ये दाखल झालीय. यानंतर पुन्हा एकदा शशी थरूर यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.
* बॉयोलॉजिकल सँपलचा चौकशीसाठी वापर... एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुनंदा याच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट दोन-तीन दिवसांत प्राप्त होईल.
* सुनंदा पुष्कर यांचं शव त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं.
* सुनंदा यांनी हॉटेलमध्ये एकट्यानेच चेक इन केलं होतं. त्या हॉटेलमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शशी थरूर यांनी केलं होतं चेक इन
काय काय घडलं आत्तापर्यंत...
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. औषधांचा ओव्हरडोस हे मृत्यचं कारण असू शकतं. अलीकडच्या काळात त्यांचं मद्यपानाचं प्रमाण वाढलं होतं. धुम्रपानाचं प्रमाणही वाढलं होतं असं सूत्रांनी दिलेल्या माहितीत कळतंय. थरूर यांचा ड्रायव्हर तसंच इतर स्टाफचीही चौकशी होणार आहे.
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. दिल्लीतल्या लीला हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडलाय. हॉटेलमधल्या रुममध्ये हा मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. गुरुवारी त्यांनी हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. शशी थरुर यांनीच सुनंदांच्या मृत्यूची बातमी पोलिसांना कळवली. याप्रकरणी आता हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातंय. त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्टसचीही मदत घेतली जातेय. मात्र सुनंदा पुष्कार यांचा मृत्यू कशामुळे झाला हे रहस्य पोस्टमार्टमनंतर पुढे येणार असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्यावर त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनी गुरुवारी गंभीर आरोप केले होते. थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी असलेल्या कथित प्रेम संबंधांमुळे सुनंदा पुष्कर त्यांच्यावर प्रचंड नाराज होत्या.. एवढंच नव्हे तर त्यांनी थरूर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यांच्यावतीनं मेहर तरार यांना काही ट्विट मेसेजही पाठवले होते. या दोघींमध्ये ट्विट युद्धही गाजलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.