www.24taas.com, नवी दिल्ली
श्रीनगरमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे आज लोकसभेत जोरदार पडसाद उमटले. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. मात्र त्यांनंतर शिंदे यांनी लोकसभेत निवेदन केलं. श्रीनगरमधील हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातलेच असल्याचा संशय असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
जप्त केलेली हत्यारे कराचीत बनवलेली असून दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र साठा होता. सुरूवातीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांनवर ग्रेनेड फेकून हल्ला केला. त्यामुळं पाच जवान शहीद झाल्याची माहिती शिंदेंनी आपल्या निवेदनात दिली. तर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी या मुद्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले.
या हल्ल्यामागे पाकचाच हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र दहशतवादाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली. तसंच आपापसातल्या मतभेदांमुळं भारताबाबत चुकीचा संदेश जाण्याचा धोका त्यांनी यावेळी व्यक्त केला.