दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...

पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय. 

Updated: Jan 5, 2016, 03:48 PM IST
दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एसपींनी सांगितलेल्या 15 या गोष्टी...  title=

नवी दिल्ली : पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याअगोदर दहशतवाद्यांनी पोलीस अधिक्षक, त्यांचा एक मित्र आणि कूक या तिघांसहीत त्यांची एक गाडी हायजॅक केली होती. दहशतवाद्यांना जवळून पाहिलेल्या या तिन्ही महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शींनी आता आपली कथा व्यक्त केलीय. 

किडनॅप करून नंतर सोडून देण्यात आलेल्या एसपी सलविंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार-पाच दहशतवाद्यांनी त्यांची गाडी रस्त्यातच रोखून त्यांना किडनॅप केलं होतं. हे सगळे जण यावेळी सेनेच्या गणवेशात होते. त्यांच्याकडे एके ४७ देखील होती. 

सलविंदर सिंह यांचा एक ज्वेलर मित्र राजेश आणि कूक मदन लाल यांना गेल्या गुरुवारी किडनॅप करण्यात आलं होतं. पण सुदैवानं हे तिघंही सुखरुप आहेत. 

 

 

काय काय म्हटलं तिन्ही प्रत्यक्षदर्शींनी...

  1. सलविंदर सिंह आणि इतर दोघे मजारवर डोकं टेकवण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत कुणीही सुरक्षारक्षक किंवा हत्यार नव्हतं.

  2. यावेळी, सेनेच्या वेशातील दहशतवाद्यांनी अमृतसर एअरपोर्टचा रस्ता विचारत गाडी थांबवली. यावेळी राजेशच गाडी चालवत होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी जबरदस्तीनं गाडी हायजॅक केली, असं राजेश यांनी म्हटलंय.

  3. यावेळी, ते एकमेकांना अल्फा, मेजर आणि कमांडर या नावानं एकमेकांना संबोधत होते. 

  4. दहशतवादी इच्छित स्थळी जाण्यासाठी जीपीआरएचा वापर करत होते. त्यांनी आपल्याला रस्ता विचारला नाही. गाडीतून जाताना त्यांनी तिघांच्याही डोळ्यावर पट्टी बांधली होती. 

  5. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळ्या दहशतवाद्यांची वय 18 ते 22 दरम्यान होते. त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. ते निळी बत्ती काढत होते आणि क्षणात लावतही होते. 

  6. एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, किडनॅप केल्यानंतर दहशतवादी असलेल्या या गाडीला पोलिसांनी एका नाक्यावर थांबवलंदेखील होतं. परंतु, गाडीची वरवर तपासणी केली. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना एअरफोर्स बेसचा पत्ताही विचारला होता. 

  7. दहशतवाद्यांनी एसपींचा फोनही वापरला. (हा फोन एसपींच्या मुलाचा होता)

  8. यावेळी दहशतवादी चॉकलेच खात होते आणि 'रेड बुल'ही पीत होते. 

  9. दहशतवादी हिंदू आणि ऊर्दूमध्ये बोलत होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये संपर्क साधला परंतु, ते उर्दुत बोलत असल्यानं ते काय बोलत आहेत हे सिंह यांना समजलं नाही.

  10. दहशतवाद्यांनी राजेशला ही गाडी कोणाची आहे? एसपी काय असतं? एसपी म्हणजे डीएसपी तर नाही ना? वर्मा यांनी होय म्हटल्यानंतर दहशतवाद्यांनी गाडी जोरात चालवण्याचे आदेश दिले. यावेळी, राजेश गाडी चालवत होते. 

  11. एका ठिकाणी गाडी थांबवून दहशतवाद्यांनी एसपी सिंह आणि त्यांच्या कूकला गाडीखाली उतरवलं... आणि जागेवरच उभं राहण्याचे आदेश देऊन त्यांनी राजेशला गाडी सुरू करायला सांगितलं.

  12. गाडी चालवत असताना राजेशचा हात चुकून हूटरवर लागला. यावेळी फोनवर त्याच्या निर्देशकांशी संवाद साधणाऱ्या दहशतवाद्यानं ही एखाद्या अधिकाऱ्याची गाडी असल्याचं सांगितलं. गाडीतून उतरवलेल्या दोघांना ठार करण्याचे निर्देशही दिले.

  13. यानंतर दहशतवाद्यांनी गाडी पुन्हा मागे वळवली. परंतु, या ठिकाणावर एसपी आणि कूक नव्हते.

  14. तुझ्या मित्रांना उद्या सकाळपर्यंत इथं उभं राहण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी आम्हाला धोका दिला. याची शिक्षा तुला भोगावी लागेल, असं म्हणत दहशतवाद्यांनी राजेश यांच्या गळ्यावर चाकू फिरवला... आणि त्यांना तिथेच फेकून दहशतवादी निघून गेले. 

  15. राजेश यांनी यानंतर जवळच्याच एका गावात जाऊन मदत मिळवली आणि तिथून त्यांनी आपल्या सासऱ्याला फोन केला.