www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरातच्या एका महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याच्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय. ज्या महिलेवर पाळत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातंय त्या महिलेच्या वडिलांनी, या प्रकरणाच्या चौकशीचे काहीही गरज नसल्याचं म्हटलंय. यासाठी त्यांनी राष्ट्रीय आणि गुजरात महिला आयोगाला पत्रदेखील लिहिलंय. तर दुसरीकडे, काँग्रेसनं या प्रकरणाला खोदून काढत ‘नरेंद्र मोदी इश्कजादे आहेत... त्यांचं या महिलेशी ‘खाजगी’ संबंध असल्याचा’ आरोप केलाय.
कोब्रापोस्ट आणि गुलैल या दोन शोधकर्त्या वेबपोर्टलनं १५ नोव्हेंबर रोजी केलेल्या दाव्यात, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा जवळचा मानला जाणारा सहकारी आणि राज्याचे माजी गृह राज्यमंत्री अमित शाह यांनी एका ‘साहेब’च्या सांगण्यावरून २००९ साली एका तरुणीच्या अवैध पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं होतं.
महिलेलाही होती कल्पना...
संबंधित विवाहित महिलेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, माझ्या मुलीच्या खाजगी जीवनाचा आदर करून या प्रकरणाला मूठमाती द्यावी अशी विनंती केलीय. माझ्या मुलीलादेखील तिच्यावर पाळत ठेवण्यात आली होती याची कल्पना होती असं त्यांनी म्हटलंय. ‘मी माझ्या मुलीच्यावतीनं नम्रतापूर्वक विनंती करतो की, मी जी मदत मागितली होती, त्याची पूर्ण कल्पना माझ्या मुलीला होती. तिच्या खाजगी जीवनाचं कुणीही उल्लंघन केलेलं नाही आणि या प्रकरणाच्या पुढच्या चौकशीचीही काही गरज नाही’ असं त्यांनी म्हटलंय.
मोदी इश्कजादे...
या मुद्द्यावर विरोधी पक्षांनाही भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्याची संधी मिळालीय. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणाच्या चौकशी मागणी जोर धरतेय. दरम्यान, गुजरातचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया यांनी एका चॅनलशी बोलताना, ‘मोदी तर साहेबजादे आहे... आणि इश्कजादेही... खरं म्हणजे, त्या मुलीसोहत मोदींचे खाजगी संबंध होते त्यामुळेच त्यांनी तिच्यावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते’ असं म्हटलंय.
भाजपचं स्पष्टीकरण…
दरम्यान, यावर मोदींचा बचाव करत भाजपनं, महिलेच्या वडिलांनीच मोदींकडे तिच्या सुरक्षेची मागणी केली होती. कारण, गुजरातचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा तिला त्रास देत होते, असं म्हटलंय.
दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी या आरोपांना धुडकावून लावलंय. राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणात मोदींना एक नोटीस धाडलीय ज्यामध्ये, या महिलेवर छुप्या पद्धतीनं सरकारी पाळत ठेवण्याची काय गरज पडली? असा सवालही विचारण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.