`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`

भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 20, 2013, 11:53 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.
‘मी एका दुकानात खरेदी करत होते. अचानक तीन जण माझ्या बाजुला येऊन उभे राहिले आणि त्यांनी दुकानातच अश्लील हावभाव आणि बोलणं सुरू केलं. पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं पण त्यांचा हा प्रकार बराच वेळ सुरू राहिला. त्यानंतर मी त्यांच्यावर चांगलीच भडकले आणि त्यांना तिथून हाकलून लावलं. ६५ व्या वर्षी माझ्यासोबत असं घडत असेल तर माझ्या मुलीला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल याची तुम्हालाही कल्पना असेलच’ असं शोभा डे यांनी म्हटलंय. इंडिया हॅबिटायट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याशी गप्पा मारता-मारता शोभा डे बोलत होत्या.
‘भारतातील पौराणिक कथांमध्ये महिलांच्या छेडछाडीला फारसं महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही. तोच प्रकार अजूनही सुरू आहेच. आम्ही अजूनही याबाबतीत गंभीर झालेलो नाही. समाजाच्या मानसिकतेत बदल झालाय पण तरीही महिलांचं जीवन वाटतं तितकं सोप भारतात तरी अजून नक्कीच नाही’ असंही शोभा डे यांनी म्हटलंय.

डे म्हणतात, ‘आधुनिक युगात महिलांना, मुलींना स्वत:ला झाकून ठेवण्याच सल्ला देणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. बाई कितीही झाकलेली असेल तरी कधी कुठून कोण येऊन छेड काढील... अश्लील वक्तव्यं करील, याची महिलांना रस्त्यावर चालता चालताही सतत धास्ती असते. असं नाही की हे पहिल्यांदाच होतंय. पण आज गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा होता नाही.’ ज्यावेळी शोभा डे स्वतःबद्दलचा हा घृणास्पद किस्सा सांगत होत्या तेव्हा संसदेत (सोमवार, १८ मार्च) राजकीय पक्षांचे खासदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी शारीरिक संबंधांचे वय १८ वरून १६ करण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर विचारविनिमय करत होते.