मुंबई : टी२० वर्ल्डकपमध्ये लवकरच होणाऱ्या भारत - पाकिस्तान मॅचची उत्सुकता अनेकांना लागलीय. पण, याच दिवशी दिवे बंद करून 'अर्थ अवर डे' साजरा करण्यात येणार आहे... त्यामुळे, ही मॅच कशी पाहावी, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडलाय.
यावर, क्रिकेटर शिखर धवननं उपाय सुचवलाय. ग्लोबल वॉर्मिंगविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगभरात 'अर्थ अवर' साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्यात यावा, हाच त्यामागील उद्देश असतो. क्रिकेटपटू शिखर धवन हा यंदा भारतात 'अर्थ अवर'विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.
याचाच भाग म्हणून, शिखरनं 'भारत-पाकिस्तान मॅच पाहा... पण, अंधारात' असा उपाय सुचवला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी रात्री ८.३० ते ९.३० असा एका तासासाठी जगभरात गरजेचे नसलेल्या लाईटस् बंद करण्यात येतात. विविध संस्था आणि व्यक्ती यामध्ये स्वत:हून सहभागी होतात.
तुमचाही मॅच पाहायचा प्लान असेल... तर नक्की पाहा पण, या एका तासासाठी तरी घरातील, ऑफिसमधील अनावश्यक दिवे आणि उपकरणं बंद करणं विसरू नका. उल्लेखनीय म्हणजे, या वेळेमध्ये इंडिया गेट, राष्ट्रपती भवन सह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांतील दिवेही बंद ठेवण्यात येणार आहेत.