नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात ज्येष्ठ महिला पत्रकार नलिनी सिंह यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. सुनंदा आपल्या मृत्यूच्या अगोदर काही तास खूप तणावाखाली होती आणि ती रडत होती, असं नलिनी सिंह यांनी म्हटलंय.
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी ज्या शेवटच्या व्यक्तीशी आपल्या मोबाईलवरून संपर्क साधला होता, ती व्यक्ती म्हणजे नलिनी आहेत. ‘झी मीडिया’सोबत बोलताना नलिनी यांनी हा खुलासा केलाय. सुनंदा यांनी 17 जानेवारी रोजी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी आपल्याला फोन केला होता, असं नलिनी यांनी म्हटलंय.
‘सुनंदाचा फोन मी रिसिव्ह केला... ती खूप तणावाखाली होती आणि रडत होती. ट्विटरवर सुरु असलेल्या पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि तिच्यात सुरु असलेल्या वादामुळे ती तणावाखाली आहे, असं मला त्यावेळी वाटलं. पण, सुनंदानं शशी थरूर यांनी आपल्या ब्लॅकबेरी मॅसेंजर मधील संदेश डिलीट केल्याचं सांगितलं. मी मीडियाशी संबंधीत असल्यानं हे संदेश पुन्हा मिळवण्यासाठी मी तिची मदत करायला हवी, असं सुनंदानं मला म्हटलं’.
‘मृत्यूपूर्वी सहा महिन्यांअगोदरही सुनंदानं आपल्या घरी डिनर करताना मला तरारबद्दल सांगितलं होतं... सुनंदा दुबईमध्ये आपला पती शशि थरूर आणि तरार यांच्या झालेल्या भेटीमुळेही खूप चिंतेत होती, असंही नलिनी यांनी म्हटलंय.
सुनंदा पुष्कर यांचा 17 जानेवारी रोजी दिल्लीतल्या एका हॉटेलच्या रुममध्ये मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्यापूर्वी थरुर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्या कथित संबंधांमुळे सुनंदा आणि मेहर तरार यांचा ट्विटरवर बराच वादही झाला होता.
पोस्टमॉर्टेममध्ये सुनंदा यांच्या दोन्ही हातांवर एक डझनहून अधिक जखमांचे निशान आढळले होते. तसेच गालावरही एखाद्या धारदार वस्तूचा उपयोग केल्याचंही आढळून आलं. याशिवाय त्यांच्या डाव्या हातावरही दातांनी चावल्याचे निशाण दिसून आले.
एम्समध्ये पोस्टमॉर्टेमनंतर सुनंदा यांच्या शरीराच्या भागांचे काही नमुने सुरक्षित ठेवण्यात आले होते. हे नमुने परिक्षणासाठी सीएफएसएलकडे पाठवण्यात आलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीएफएसएल अहवालात ड्रग पॉयजनिंगचे संकेत दिले गेले होते. परंतु हे निर्णायक नव्हते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.