www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
पाकच्या नापाक हल्ल्याला बळी पडलेल्या जवानांचं शव पटना विमातळावरून त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले. पण, याच विमानतळावर मात्र या शहीद जवानांचा घोर अपमान आपल्याला ‘नेता’ म्हणविणाऱ्या व्यक्तींनी केलाय.
बुधवारी रात्री १० च्या सुमारास पटना एअरपोर्टवर शहीदांचं शव दाखल झाली होती. इथूनच शहीदांचं शव त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले. पण, या ठिकाणी शहीदांच्या सन्मानात त्यांना सलामी देण्यासाठी बिहारी सरकारचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळे अलबत्ता दानापूर रेजिमेंटचे कमांडंट ए. के. यादव आणि नायब आसिफ हुसैन तसंच अन्य जवानांनीच या शहीदांना सलामी दिली.
जवानांनी शहीदांना योग्य सन्मान दिल्यानंतर त्यांचं पार्थिव वेगवेगळ्या ट्रकांमध्ये ठेवून त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. देशासाठी आपले प्राण गमावणाऱ्या पाच जवानांपैकी चार जवान हे बिहारचे आहेत. नाईक प्रेम नाथ - छपरा (३५ वर्ष), लांस नायक शंभु सरन - भोजपूर (२९ वर्ष), सैनिक विजय कुमार राय - पटना (२७ वर्ष), सैनिक रघुनंदन - छपरा (२३ वर्ष) अशी या शहीद जवानांची नावं आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद विजय राय यांचं शव दानापूर छावनीमध्ये तर इतर जवानांचं पार्थिव भोजपूर आणि सारण स्थित त्यांच्या घरी पाठवण्यात आलं.
पाटण्यात एकप्रकारे शहीदांच्या झालेल्या या अपमानास्पद घटनेनं नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केलाय. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांसाठीही वेळ न काढू शकणाऱ्य़ा ढिम्म नेत्यांविषयी जनतेनं नाराजी व्यक्त केलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार बिहारचं मॉडेल प्रदर्शित करण्यासाठी राज्याबाहेर गेलेले आहेत. पण, इतर मंत्री मात्र यावेळी का उपस्थित राहिले नाहीत? याचं उत्तर टाळण्याचाच प्रयत्न आता बिहार सरकार करतंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.