वेश्यांच पुनर्वसन... घरांसहीत सुविधाही मिळणार मोफत

आशियातल्या सगळ्यात मोठ्या रेड-लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या `सोनागाछी`मध्ये काम केलेल्या आणि सध्या वेश्यावृत्ती सोडलेल्या सेक्स वर्कर्स महिलांचं लवकरच नवीन घरं देऊन पुनर्वसन केलं जाणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 23, 2013, 05:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
आशियातल्या सगळ्यात मोठ्या रेड-लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या `सोनागाछी`मध्ये काम केलेल्या आणि सध्या वेश्यावृत्ती सोडलेल्या सेक्स वर्कर्स महिलांचं लवकरच नवीन घरं देऊन पुनर्वसन केलं जाणार आहे. या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वृद्धावस्था आणि त्यामुळेच ग्राहक न मिळण्यानं या महिलांना गरिबीत जीवन जगावं लागतंय.
शक्तीहिन, रोगी आणि कोलकातामध्ये राहून हलाखित जीवन जगणाऱ्या वयोवृद्ध सेक्स वर्कर्सचं पुनर्वसन करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं एक योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेनुसार, या महिलांसाठी दोन इमारतींमध्ये पुनर्वसन केंद्र बनवले जातील. इथे जेवण, कपडे, आश्रय आणि स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी इतर सुविधाही उपलब्ध असतील.
महिला आणि समाज कल्याण विभागाचे सचिव शशि पांजा यांच्या माहितीनुसार, ‘त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य चांगल्या पद्धतीनं आणि आरामात व्यतीत करावं यासाठी त्यांना घरं देण्याचा विचार सरकारनं केलाय’. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या आदेशांनुसार सोनागाचीमध्ये सर्व्हेक्षण करण्यात आलं आणि यामध्ये अशा ७५० गरजु सेक्स वर्कर्स महिला आढळून आल्या होत्या.
स्वास्थ्याची योग्य काळजी न घेतल्यामुळे आणि योग्य सुविधा न पोहचल्यामुळे या सेक्स वर्कर्समध्ये एचआयव्ही संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महिलांसाठी जवळपास २०० सेक्स वर्कर्ससाठी पुनर्वसन केंद्र बनविण्याच्या प्रस्तावाला याआधिच परवानगी दिलीय. ही योजनेची अंमलबजावणी राज्याच्या समाज कल्याण विभागाद्वारे केली जाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.