मुंबई : विवाहपूर्व शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार ठरू शकत नसल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये सध्या विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे, लग्नाचे आश्वासन देऊन ठेवलेले शरीरसंबंध म्हणजे बलात्कार ठरत नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे.
नाशिकमधील वकिल असलेल्या एका प्रेमीयुगुलाचे प्रकरण मुंबई हायकोर्टात आले आहे. यातील तरुणीने तिच्या प्रियकरावर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या तरुणाने मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. '१९९९ पासून आमचे प्रेमसंबंध होते.
आम्हा दोघांचा धर्म वेगळा असल्याने तिच्याशी लग्न करता आले नाही. मात्र दोघांमध्येही संमतीने शरीरसंबंध निर्माण झाले होते' असा युक्तीवाद संबंधीत तरुणाने कोर्टासमोर केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यावर हायकोर्टाने विवाहपूर्व शरीरसंबंध आणि बलात्काराच्या घटना याविषयी मत मांडले आहे.
सध्या प्रेमसंबंधांमध्ये लग्नापूर्वीच शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुंबई, पुणे सारख्या मेट्रो शहरांमध्ये तर यासाठी संमतीच मिळू लागली आहे. शहरातील उच्चशिक्षीत तरुणींनी विवाहपूर्व शरीरसंबंधांचे परिणाम आणि त्यांच्या शारीरिक गरजा लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्याचा एखाद्या तरुणीचा निर्णय हा तिच्या संमतीने होता की नाही हे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ठरु शकते असे सांगत कोर्टाने उदाहरणही दिले आहे. पहिले लग्न लपवून ग्रामीण भागातील अशिक्षित तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कार ठरु शकतो असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
संबंधीत प्रकरणातील तरुणी ही उच्चशिक्षीत असून शरीरसंबंधांसाठी तिचीही संमती असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने संबंधीत तरुणाला जामीन मंजूर केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.